Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राची ‘मिरासदारी ‘ संपली !

ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार निर्वतले.

 

 

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार आणि विनोदी लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मिरासदार हे साहित्य वर्तुळात ‘दमा’ आणि ‘दादासाहेब’ या नावाने प्रसिद्ध होते.
‘बापाची पेंड’ या सन १९५७ साली प्रकाशित आलेल्या त्यांच्या पहिल्याच कथासंग्रहाने त्यांना ग्रामीण कथाकार अशी मान्यता मिळवून दिली. या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांचे हुबेहूब, विरंगुळा, स्पर्श, मिरासदारी आणि अलिकडेच प्रकाशित झालेला भोकरवाडीच्या गोष्टी हे कथासंग्रह लोकप्रिय ठरले. मिरासदार यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामीण जीवनातील विसंगती, विक्षिप्तपणा आणि इरसालपणाच्या आधाराने आपला विनोद फुलवला.

मिरासदार यांनी ललितलेखनही केले आहे. सरमिसळ, गप्पांगण हे त्यांचे ललित लेखसंग्रह देखील गाजले. ललित लेखनासोबतच मिरासदार यांनी एकांकिकाही लिहिल्या. त्यांच्या एकांकिका सु्ट्टी व पाच एकांकिका या नावाने प्रसिद्ध आहेत.
▪️मिरासदारांचा थोडक्यात परिचय
दत्ताराम मारुती मिरासदार हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार
शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले.
पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारीता
इ. स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला.
पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत.
कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे.
कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत.
द.मा.मिरासदार हे अत्यंत प्रवाही आणि लोभस भाषेत कथा कथन करणारे महाराष्ट्रातील उत्तम कथाकार होते, त्यांच्या जाण्याने ग्रामीण साहित्यात व कथा कथनाच्या क्षेत्रात भरून न येणारी जागा रिकामी झाली आहे.
डॉ.संजय कळमकर
प्रसिद्ध साहित्यिक, कथा कथनकार