Take a fresh look at your lifestyle.

“आमदार लंके,तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात !”

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे गौरोद्गार.

पारनेर : संघर्ष करणारी दोन माणसं एकत्र आली तर त्यांना एकमेकांविषयी माया वाटते. आपलीच एक प्रतिकृती सामान्य माणसांसाठी लढते याचा मला सार्थ अभिमान आहे. मी मंत्रालयात असो वा परळीत मला आ. लंके यांच्या कामाचे कौतुक वाटते. असे सांगतानाच आ. लंके यांना लोेकमान्यता मिळाल्यानेच त्यांना सर्वजण नेेते म्हणून संबोधतात असे राज्याचे विधी व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
वाडेगव्हाण येथील ७ कोटी ७९ लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन तसेच लोकार्पण मंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार निलेश लंके, अशोक सावंत, बाबाजी तरटे, उद्धव दुसुंगे, सुदाम पवार, सुरेश धुरपते, सुनंदा धुरपते, राजश्री कोठावळे, पुनम मुंगसे, विक्रम कळमकर, जितेश सरडे, विजय औटी, किशोर यादव, श्रीकांत चौरे , विशाल आहेर, अतुल लोखंडे, नीलेश लटांबळे, किरण पठारे, सोमनाथ वाखारे, सरपंच बाळासाहेब सोनवणे, उपसरपंच रवी शेळके, डॉ. मच्छिंद्र नरवडे, जालींदर तानवडे, भानुदास घनवट, अरूण घनवट, प्रमोद घनवट, राजेंद्र शेळके, उध्दव शेळके, योगेश रासकर, अमोल यादव, यादववाडीच्या सरपंच मिनाताई यादव व सदस्य, वाडेगव्हाण ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुुंडे म्हणाले, आ. लंके यांच्या पक्षप्रवेशाला मी उपस्थित होतो. जिवनात मी अनेक सभा पाहिल्या मात्र लंके यांच्या प्रवेशाची सभा नेहमीच स्मरणात राहील. कार्यक्रमास उत्स्फुर्त गर्दी, सभेला येण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्याच व्यासपीठावर निवडणूकीसाठी मदतीचे धनादेश ! आ. लंके तुम्ही खरोखर भाग्यवान आहात ! तुमचं व माझं सारखंच आहे. फक्त माझ्या नावात दम आहे. मलाही तुमच्या सारखाच संघर्ष करावा लागला असे ते म्हणाले.
शरद पवार यांचा ५५ वर्षांचा राजकीय प्रवास पाहिला तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलेे काम त्यांनी केले असल्याचे कृतीतून दिसून येते. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. महिलांना संधी दिली. मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीला दोष दिला जातोय. परंतू न्यायालयात साक्ष पुरावे भाजपाच्या सरकारच्या काळात झाले, निकाल मात्र आमच्या काळात लागला मग आम्ही दोषी कसे असा सवाल त्यांनी केला.

सकाळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आ. लंके यांच्या घरी भेट दिली. वारकऱ्याच्या घरी साक्षात विठ्ठल आला असेच या प्रसंगाला म्हणावे लागेल. आ. लंके यांच्या मागे अदभूत  शक्ती आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामातून त्याची प्रचिती आली. ज्या काळात माणूसकी हारवली होती त्या काळात कारोना रूग्णांना त्यांनी माणूसकी  दाखविली. या माणसाला माणूस नाही तर देव म्हणावे लागेल. त्यांनी कोरोच्या दोन्ही लाटांमध्ये माणूसकी जागविली. कोणी कीतीही काही करू द्या,  या मतदारसंघात नीलेश लंके सोडून काहीच होणार नाही. माझ्या विभागाकडून इतरांपेक्षा कणकभर जास्तच निधी देण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला.
अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या किशोर यादव यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. वाडेगव्हामध्ये आतापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमाची उपस्थितीत लक्षवेधी होती. मोठ मोठे बॅनर, विशाल हार, फटाक्यांच्या आताशबाजीसह मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. युवा कार्यकत्याचा दमदार कार्यक्रम अशीच या कार्यक्रमाचे वर्णन करावे लागेल.