Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांनाही भावला लंके परिवाराचा साधेपणा !

अन् कार्यकर्त्यांच्या आनंदालाही आले उधाणं.

 

 

पारनेर : साधी राहणी, साधे घर, आणि साधा परिवार यामुळे पारनेर – नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे नेहमीच राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत. आज अनाहुतपणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आमदार लंके यांच्या हंगा येथील घरी भेट देवून हा साधेपणा अनुभवला. खा.पवारांच्या भेटीने कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. लंके यांच्या परिवाराचा हा साधेपणा शरद पवारांना भावला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नगर येथे झालेल्या विविध कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदार लंके यांच्या हंगा या गावाला अचानकपणे भेट दिली. त्यांच्यासमवेत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित होते आमदार लंके यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले.
शरद पवारांसारखा राष्ट्रीय नेत्यांनी अचानकपणे हंगा गावाला भेट दिल्याने हंगेकरांनाही हायसे वाटले. आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामांमुळे त्यांची ख्याती देशभरात पोहोचली आहे. संपूर्ण पवार परिवारच त्यांच्या कामावर खुश आहे याची पावती आज त्यांना मिळाली.कामाचा प्रचंड व्याप आणि दौरे असणाऱ्या शरद पवारांनी आमदार लंके यांच्या साध्या घरी भेट देऊन लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके गुरुजी व आई शकुंतला अक्का यांच्यासमवेत गप्पा मारल्या. मुलांच्या शिक्षणाविषयी चर्चा करून पवारांनी थेट मुलांशीही संवाद साधला. पवारांच्या अचानक भेटीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.
आमदार लंके यांच्या परिवाराचा साधेपणा शरद पवारांना भावून गेला.शरद पवारांचे आमदार यांचे यांच्या घरी अचानक होणारे थेट आगमन यामुळे ते राज्यात चर्चेचा विषय ठरणार हे मात्र नक्की !