Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार शून्य टक्के व्याजदराने !

'या' सहकारी बॅंकेने दिवाळी आधीच दिली भेट.

शिरूर : पुणे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मोठी दिवाळी भेट देण्यात आली. शुक्रवारी झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आता यापुढे शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांनी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तीन लाखांवरील पुढील रकमेचे व्याज बँकेने स्वतःच्या नफ्यातून सोसण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत केली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संस्थांचे प्रतिनिधी, व्यक्ती सभासद सहभागी झाले होते. सन २०२० – २१ या आर्थिक वर्षासाठी बँकेने संस्थांना आठ टक्के दराने लाभांश जाहीर केला.

गेल्या मार्च अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेकडे ११ हजार ३२९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने आठ हजार १०९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला २८२ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असून,नफा वाटणी यातील तरतुदी वजा जाता निव्वळ ५५ कोटी दहा लाख रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य टक्के असल्याचे थोरात यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या बँकेच्या प्रचलित धोरणानुसार तीन लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने सभासद शेतकऱ्यांना दिले जाते. यापुढे ही मर्यादा पाच लाख रुपयांपर्यंत वाढ करावी. तीन लाख रुपयांच्या पुढील रकमेचे व्याज बँकेने सोसावे अशी सूचना केली. याबाबत सहकार खात्याकडे रीतसर प्रस्ताव पाठवून मान्यता मिळाल्यानंतर या धोरणांची निश्चिती करावी, असे अजित पवार यांनी सुचविले.त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे.