Take a fresh look at your lifestyle.

तमाशाच्या पाच पिढ्यांचा साक्षीदार गेला !

ज्येष्ठ तमाशा फडमालक हरिभाऊ बडे यांचे निधन

 

 

पाथर्डी / शिरूर : महाराष्ट्रसह परराज्यातील तमाशा रसिकांची करमणूक करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि फडमालक हरिभाऊ बडे नगरकर यांनी कोरडगाव ( ता. पाथर्डी) या आपल्या गावी काल सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. तमाशाच्या पाच पिढ्यांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण तमाशा सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अर्धांगवायू या आजाराने ते दीर्घकाळ अंथरुणावर खिळून होते. तत्पूर्वी त्यांच्या ह्रदयाच्या दोन शस्त्रक्रियाही झाल्या होत्या.
आजच्या आघाडीच्या फडाच्या तमाशात त्यांची गणना होत होती. त्यांचे आजोबा गणपत बडे आणि वडील दशरथ बडे हेही तमासगीर. त्या दोघांनाही गाण्याची उत्तम समज होती. दोघेही उत्तम कलाकार त्यांचाच वारसा हरिभाऊंनी घेतला. हरिभाऊ स्वतः गाणी लिहायचे त्याला चाली लावायचे आणि सादरही करायचे. त्यांच्या जय भवानी, पंढरीचा पांडुरंग, डाकू फुलन, राजा हरिश्चंद्र, मुंबईची गोल्डन गँग, पापा आधी भरला घडा, वनराज केसरी अशा वगातील भूमिकाही गाजल्या.
तमाशाचं अस्थिर जीवन जगताना हरिभाऊंनी असंख्य अडचणींना तोंड दिले. अनेक तमासगीरांचे तमाशे मोडून ते पुन्हा उभे राहिल्याची उदाहरणे आपण बघितली आहेत पण हरिभाऊंचा तमाशा एकदा- दोनदा नव्हे तर पाच वेळा कोलमडून पडला पण तमाशा रसिकांचे प्रेम इतके की रसिकांनी पुढाकार घेऊन हरिभाऊंना पुन्हा पुन्हा तमाशा उभारून दिला.
सन 1940 च्या सुमारास वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी तमाशात काम करायला सुरुवात केल्यानंतर ते 2015 पर्यंत तमाशात कार्यरत होते. त्यानंतर पॅरालिसिसमुळे त्यांच्यावर शारीरिक बंधने आली आणि त्यांनी तमाशातील काम थांबवले. महाराष्ट्राच्या तमाशा इतिहासात तब्बल 75 वर्षे रंगभूमीवर वावरणारे हरिभाऊ हे कदाचित एकमेव कलाकार असावे. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या नंदाराणी बडे यांनी आणि सध्या हरिभाऊंच्या नात शिवकन्या हा वारसा पुढे नेत आहेत. तमाशात महिला सहसा वाद्य वाजवीत नाहीत पण हरिभाऊंनी नात शिवकन्याला जाणीवपूर्वक ढोलकी वाजवायला शिकवले. आज शिवकन्या उत्तम ढोलकीवादक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे.

हरिभाऊंचा लोककलेचा उज्ज्वल वारसा त्यांची मुले अशोक, पोपट, नंदा, राणी ही मुले आणि नात शिवकन्या, भाऊ हिरामण बडे पुढे नेत आहेत. हरिभाऊ बडे नगरकर यांना ‘ पारनेर दर्शन ‘कडून भावपूर्ण श्रद्धांजली!
शिरूर तालुक्यातील खंडाळे हे गांव हरीभाऊ बडे यांनी आपले मानस गांव मानले होते. या गावाने त्यांना भरभरून प्रेम दिले. अडचणीच्या काळात मदत केली. गावच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या यात्रेत हरीभाऊ बडे यांचा तमाशा ठरलेला. दरवर्षी यात्रेदरम्यान संपूर्ण खंडाळे गांव त्यांची अतुरतेने वाट पहायचे. यात्रेच्या कार्यक्रमात त्यांचा आदरसत्कार व्हायचा. तमाशाचा सीझन संपल्यानंतरही त्यांच्यासह फडातील सर्व कलाकार महिना महिना आपलं गाव म्हणून गावात रहायचे गावाने ही त्यांना कधीच अंतर दिले नाही आज त्यांच्या निधनाची वार्ता गावात समजताच त्यांच्या आठवणीने संपूर्ण गांव शोकाकुल झाले.