Take a fresh look at your lifestyle.

मनुष्याला मिळालेल्या जन्मजात गुणांचा विकास त्याला खास बनवतो !

पण दुरोपयोग झाला तर वाटोळं ठरलेलं आहे.

 

 

जन्मतःच मनुष्याला काही विशेष गुण प्राप्त होतात.त्यात गुणसूत्रे हा महत्वाचा भाग आहेच.काही विशेष गुणांचं आपण चिंतन करु.कशाला विशेष गुण म्हणायचं?बोलता सर्वांनाच येते पण बोलण्याने खिळवून ठेवण्याची क्षमता,मनं जिंकण्याची क्षमता,अतिशय सुंदर गाण्याचा गळा असणं हा विशेष गुण आहे. डोळ्यांनी सर्वच पहातात पण कोणत्याही गोष्टीतले बारकावे दिसणं हे नजरेतलं सौंदर्य प्राप्त असणं हा विशेष गुण आहे.चालता सर्वांनाच येते पण चालण्यातलं चापल्य हा विशेष गुण आहे.बुद्धी सर्वांनाच असते पण तल्लख बुद्धी हा विशेष गुण आहे. लिहिता सर्वांनाच येते पण वळणदार अक्षर हा विशेष गुण आहे.सुडौल शरीर प्राप्त होणं हा विशेष गुण आहे.
यासर्व गोष्टी जन्मानं प्राप्त होतात.थोड्याफार प्रयत्नाने त्याचा विकास करता येतो.बहुतांश या गोष्टी आम्हाला विशेष बनवतात पण हे जन्मानं मिळालेलं वरदान आहे.त्याचा सदुपयोग करणारा विशेष स्थान निर्माण करणारच.त्याला तो जन्मानं मिळालेला सन्मान आहे. आपल्यातील खास गोष्ट ज्याला सापडते तो धन्य म्हणायला हवा. पण धन्यत्व मिळणाऱ्या गुणांचा स्वामी मी नाही,जे मला मिळालं आहे त्याचा मी फक्त विकासक आहे;याचा बोध मनुष्याला सदगुणांचा स्वामी बनवतो. पण या सदगुणांचा गर्व झाला,अहम बाधा झाली की मग त्याचा अपव्यय सुरू होतो.ती अहंकाराची गाठ मनुष्याच्या वाट्याला अतोनात दुःखांची पेरणी करते.

सामान्य बुद्धीची माणसं स्वतःचं विषेश स्थान निर्माण करू शकत नाहीत.किंवा ज्यांना स्वतःतली विशेष गुण ऊर्जा बाहेर काढता येत नाही ते मरेपर्यंत सामान्यच रहातात पण जगतात आनंदाने.कारण बाधा होण्यासारखं,गर्व, अहमची गाठ तयार होण्यासारखं काही केलेल नसतच.
आपल्यातल्या विशेष गुणांचा विकास करणं अत्यानंद देणारं आहे,जीवनाचं सार्थक करणारं आहे,पण त्या गुणांचा वापर वाईट झाला की मग येणारी अवस्था अत्यंत भयंकर आहे.या शक्तिचा चांगला आणि वाईट उपयोग कसा होतो ते उद्याच्या भागात पाहु.
रामकृष्णहरी