Take a fresh look at your lifestyle.

आमदार लंकेंबरोबरच मंत्री जयंत पाटलांवरही साधला खासदार विखेंनी निशाणा !

म्हणे, अण्णांची तुलना कोणाशीही होवू शकत नाही.

 

 

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कार्यामुळे पारनेर तालुका हा अण्णांच्या नावाने ओळखला जातोय, परंतू भविष्यात तालुका आमदार निलेश लंके यांच्यामुळे ओळखला जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी परिवार संवाद यात्रेदरम्यान केले होते. जलसंपदा मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यावर खा. डॉ. सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांची कोणाशीही तुलना होवू शकत नाही. 50 वर्षांपासून ते सार्वजनिक जीवनात अतुलनीय योगदान देत आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांचे वक्तव्य समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया खा.विखे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यात पारनेर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले होते की,आमदार लंके यांनी देशात न भूतो न भविष्यती असे कोविड सेंटर सुरू केले. लोकसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरुण पिढीला आकृष्ट करणारे हे नेतृत्व तयार झाले असून लंकेमुळे महाराष्ट्रात सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश गेल्याचेही पाटील यांनी सांगितले. विकास तर होतच असतो परंतु आमदार लंके यांच्या विकासपर्वाला मानवता आणि माणुसकीचा चेहरा असल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे हा तालुका ओळखला जातो भविष्यकाळात लंके यांच्यामुळे तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला होता.
पारनेर तालुक्यात सरकारी डॉक्टरांना शिवीगाळ, तहसीलदारांचे प्रकरण, युवा अभियंत्याचा संशयास्पद मृत्यु अशी अनेक प्रकरणे गाजत आहे. जनता हे सर्व पाहत असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जनता बरोबर उत्तर देईल, असे सांगत खा.विखे यांनी आ.लंके यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.