Take a fresh look at your lifestyle.

अजितदादा,अर्धा तास आधीच शिरूरला पोहोचतात तेंव्हा…

मोजक्याच उपस्थितांमध्ये रंगला 'हा' सोहळा.

 

शिरूर : शिरूर नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होते प्रत्यक्षात मात्र अजित पवार साडेसहालाच उद्घाटनाच्या ठिकाणी पोहोचले त्यामुळे या विषयाची नंतर एकच चर्चा रंगली. मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम नंतर चांगलाच रंगला.

शिरूरकरांनी आम्हाला भरभरून दिले आता आमची जबाबदारी आहे तुम्हाला मदत करण्याची म्हणून शिरूर परिसराच्या विकास कामांसाठी दोन टप्प्यांत एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद करणार असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले.
शिरुर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन शिरुरनगरीचा विकास करावा.
नागरिकांनी आपल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊनच प्रशासनाला सहकार्य करायला हवे.  पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्यावर योग्यप्रकारे विचार करण्यात येईल.पुणे ते शिरुर रस्त्याचे दुमजली कामासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. वारीमार्गाचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावून विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या आदित्य चोपडा यांच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भेट दिली त्यानंतर त्यांनी तेथूनच नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करून या घटनेचा तातडीने तपास करून कारवाई करण्याची व संबंधितावर कडक कारवाई करावी अशी सूचना केली.