Take a fresh look at your lifestyle.

‘घोडगंगा’ने अवघ्या १५७ दिवसांत फेडले ७७ कोटींचे कर्ज !

अध्यक्ष,आमदार अशोक पवार यांची माहिती.

 

 

शिरुर : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सहवीजनिर्मिती लवकर सुरु होऊनही वीज खरेदी कराराला उशीरा झाल्याने को-जन प्रकल्प सुरु व्हायला उशीर झाला तरीसुद्धा फक्त १५७ दिवसांत को-जनचे ७७ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यास संचालक मंडळाला यश आले आहे. या वर्षी ८.५० लाख मेट्रीक टन उसाची नोंद कारखान्याकडे झाली असून जास्तीत जास्त सभासदांनी कारखान्याला उस घातल्यास कारखाना चांगल्या पद्धतीने जास्त दिवस चालेल, असे घोडगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
रावसाहेब दादा पवार घोडगंगा साखर कारखान्याची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा न्हावरे (ता. शिरूर) येथे कारखाना स्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी आमदार पवार बोलत होते.
साखरेचे दर पडल्यामुळे व वीज खरेदी करार वेळेत न झाल्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपी देण्यास उशीर झाला आहे. नुकतीच कारखान्याने २०० रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असून, आतापर्यंत २३०० रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. तसेच राहिलेले १५६ रुपये लवकरच जमा करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे, असे मत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
आ.पवार म्हणाले, ‘कर्जाची आकडेवारी अहवालात दिली असून, तरीसुद्धा विरोधक खोटा प्रचार करत आहेत. याबाबत सभासदांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांनी असे खोटे आरोप कारखान्यावर केले आहेत. त्यांच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. साखर कारखाना फक्त साखरेवर टिकणार नसून, त्याला उपपदार्थ निर्मिती करण्याची गरज आहे. आडसाली उसाचे क्षेत्र कमी झाले असून, यंदा साडे सहा लाख मेट्रीक टन गाळप व्हायला हवे. २६५ या जातीची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड करणे गरजेचे आहे.
कुठलेही सरकार बदलले कि त्यांची धोरणं बदलतात. परंतु, या धोरणामध्ये कमीत कमी १० वर्ष बदल व्हायला नको. कारण त्यामुळे खूप मोठा परिणाम साखर उद्योगावर होत असतो. साखर उद्योगातील सबसिडी बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात या उद्योगाचे नुकसान झाले आहे.’