Take a fresh look at your lifestyle.

बाबो ! जिल्ह्यातील सव्वाशे पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा !

पोलिस दलात उडाली मोठी खळबळ.

 

 

अहमदनगर : कर्तव्य बजावत असताना दिलेले काम वेळेत न करणे, गुन्ह्यांचा तपास वेळेत न करणे, गुन्हे निकाली न काढणे आदींबाबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तब्बल सव्वाशे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील अनेक वर्षात प्रथमच अशी कारवाई झाल्यामुळे जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. कारवाई करणे हा उद्देश नसून गुन्हा घडल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने तात्काळ निपटारा करणे, या जबाबदारीचे भान असणे गरजेचे आहे, हा या कारवाईमागचा उद्देश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांपासून जे काही गुन्हे दाखल आहेत, त्या गुन्ह्यांचा तपास वेळेत होणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये त्या गुन्ह्याचा निपटारा कशा पद्धतीने करायचा याचे नियम घालून दिलेले आहे. अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन होताना सर्रासपणे दिसून येत आहे. नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून सुमारे ५० हजारहुन अनेक गुन्हे प्रलंबित होते. यामध्ये २००० गुन्हे हे गहाळ झाले असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रलंबित गुन्हे हे तात्काळ निकाली काढा, जे गुन्हे गहाळ झाले आहे, त्याचा शोध घ्या, अशा प्रकारचे आदेश देऊन गेल्या आठ महिन्यापासून मोहीम सुरू केली आहे. अनेक गुन्हाचा निपटारा पोलिस विभागाने केला असून आता साधारणतः १२०१९ गुन्हा प्रलंबित राहिलेले आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून वेळेमध्ये तपास न करणे, दोषारोपपत्र वेळेमध्ये न्यायालयात दाखल न करणे, अनेक विषयामुळे ज्यांनी तक्रारी केल्या आहे, त्या निकाली न काढणे यामुळे गुन्हे प्रलंबित राहिले. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी आता अर्ज न घेता थेट गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये त्याची कार्यवाही सुरू आहे.
पोलीस प्रशासनामध्ये ई-टपाल सुविधा सुद्धा आता सुरू झालेली आहे. त्यामुळे कुठलेही काम प्रलंबित राहता कामा नये, कोणाकडे कोणते काम दिले हे आता दिसून येत आहे.गुन्हे निकाली काढण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कारवाई केली आहे.
यामध्ये ३० अधिकारी व ९३ कर्मचारी यांचा समावेश आहे. अधिकारी वर्गामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचाही समावेश आहे. यामध्ये काहींना दोन वेळा नोटीसही देण्यात आलेली आहे.