स्वार्थाशिवाय जगण्याचं कारणच काय?जगणं हाच एक स्वार्थ आहे. मग त्यात सर्व इच्छा आकांक्षांची गर्दी आलीच.सुविधांनी स्वार्थ बळावतो.त्याचही एक खास स्थान बनतं.उदा. पानावर,पत्रावळीवर,ताटात जेवण तेच पण मिजास वाढते.कुणाकुणाला ते ताट टेबलावरच लागतं.त्यातही मग टेबल कसा असावा,खुर्ची कशी असावी यावर चर्चा !
पुर्वी पितळीने चहा प्यायला काहीच वाटत नव्हतं.पण आता कप त्याचं डिझाइन अजून बरच काही.पण हे वेगळं गरजेचं आहे?हिताचं काय आहे यात?चहा तर हिताचा नाहीच.जेवण महत्त्वाचे आहे पण साधनांनी,सुविधांनी जेवण हितावह होण्याचा संबंधच नाही. त्याचा संबंध आहे आपल्या प्रसन्नतेशी.स्वार्थातुन इच्छा निर्माण होते.आणि हित कळाले की स्वार्थ संपतो.आपण हित कशाला समजतो?
सतत प्रापंचिक अनुषंगाने काहीतरी मिळवण्याची इच्छा आणि त्यायोगे प्रयत्न करीत रहाणे म्हणजे स्वार्थ.त्याविरुद्ध सतत देण्यासाठी प्रयत्नशील असणं म्हणजे हितोपासना आहे.साक्षीभावाने जीवन जगण्याचा प्रयत्न म्हणजे हितोपासना आहे.
तुकोबाराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता। कोणतं हित पहाण्यासाठी जागं असलं पाहिजे?याचं उत्तर स्वार्थी जीवन सोडल्याखेरीज मिळणार नाही. महाराज म्हणतात,आपुले हित आपण पाही।संकोच तो न धरी काही।। आपलं हित ज्यामुळे होणार आहे तेथे संकोच,लाज बाळगु नये.सांगतो ते धर्म नितीचे संकेत।सावधान हित व्हावे तरी।।जीवन जगताना नितीधर्माने वागण्यात हित आहे असं महाराज म्हणतात.
त्यासाठी देवाचं चिंतन केलं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन।
देवाच्या चिंतनाने स्वार्थबुद्धी लोप पावून हितबुद्धी प्राप्त होते.स्वहित समजले की कुणाचं नुकसान करण्याचं मनात येत नाही. आपल्या भल्यासाठी कुणाचं वाटोळं होणार असेल तर ते हिताचं नाही याचा बोध होणं म्हणजे हित जोपासना आहे.नरदेहात देव आपलासा करण्याची ती एक पायरी आहे.त्यामुळे स्वार्थाची जोपासना न करता हित जोपासावे.