Take a fresh look at your lifestyle.

बैलगाडा शर्यत बंदीमुळे ग्रामीण अर्थकारणाला बसला सुमारे ३७ कोटींचा फटका !

शर्यतीला परवानगी द्या : प्रकाश गवारेंची मागणी.

 

शिरूर : बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला अनेक वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक वारसा आणि शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते. बैलांचे संगोपन शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने करतो. बैलांचे प्रदर्शन आणि शर्यतबंदी यांमुळे बैलांच्या जाती नामशेष होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने बैलगाडा शर्यत तातडीने चालू करावी ,अशी मागणी गाडामालक प्रकाश गवारे यांनी केली आहे.
“शर्यतबंदीमुळे देशी गाय-बैलांचे उपयुक्ततामूल्य धोक्यात आल्याने जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे; तसेच शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे. ग्रामीण भागात देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैल-गाय प्रदर्शन आणि शर्यती आयोजित करण्याची मोठी परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते.
प्रदर्शनातून आणि शर्यतीमधून निवड व्हावी म्हणून चांगला खुराक देऊन जनावांचे संगोपन केले जाते; परंतु सामान्य शेतकऱ्याच्या संगोपनाच्या हेतूंविषयीच शंका घेतली जात आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी दुखावला गेला आहे.” असे श्री. गवारे यांनी यावेळी सांगितले..
ते पुढे म्हणाले, बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण अर्थकारण अवलंबून आहे. गावच्या वार्षिक धार्मिक यात्रेच्या प्रसंगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. पुणे जिल्ह्यातील उदाहरण पाहिल्यास एका दिवसात एका शर्यतीच्या धावपट्टीवर साधारण दोनशे ते अडीचशे बैलगाडे एकापाठोपाठ पळवले जातात. चार ते पाच दिवस शर्यत चालते. एका बैलगाड्याला चार बैल जुंपलेले असतात. म्हणजेच साधारणत: एका गावात चार हजार बैल शर्यतीसाठी आणले जातात. त्यासाठी टेम्पो आणि ट्रकची वाहतूक व्यवस्था असते. गावच्या यात्रेला शर्यती असल्याने उत्सवाचे स्वरूप मोठे असते. पाहुण्यांची वर्दळ वाढते. परिणामी हार-फुले, बैलांचे साहित्य, चहा ,नाश्तापाणी, हॉटेल; तसेच किराणा मालाच्या दुकानांत लाखो रुपयांत उलाढाल होते. बैलगाडा शर्यतीसाठी लाकडी बैलगाड्याची आवश्यकता असते.
उत्सवात वाजंत्री, तमाशा कलावंत, ग्रामीण कारागीर या सर्वांसाठीही मोठी आर्थिक उलाढाल होते.“आज महाराष्ट्रात शर्यतीचे जवळपास २७ लाख बैल शर्यतबंदीमुळे बांधून आहेत. आता या बैलांचे करायचे काय, असा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या समोर आहे; कारण शर्यतीच्या बैलांची विशेष जोपासना केलेली असते. त्यांना शेतीकामासाठी वापरले जात नाही. शर्यतीच्या बैलाची किंमत ५० हजारांपासून पाच लाख रुपयांपर्यंत आहे. शर्यतीच्या बैलांचे किमतीसह उत्सवांमध्ये होणाऱ्या एकूण उलाढालीचा विचार केल्यास जवळपास ३७ हजार कोटी रुपयांच्या ग्रामीण अर्थकारणाला शर्यतबंदीमुळे फटका बसला आहे; तसेच शर्यत बंद असल्याने या बैलांच्या सरावाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या धष्टपुष्ट बैलांना सरावाची आवश्यकता असते; पण सराव करायला नेल्यास पोलिस कारवाई करतात. म्हणून सरावाअभावी त्यांच्या शरीर प्रकृतीत बदल होत आहे. त्यामुळे अनेक बैल आकस्मिक गोठ्यातच मरण पावल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खिलार जातीचे बैलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. असे श्री. गवारे यांनी सांगितले.