Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्यम ! न्हावरा फाटयावरील ‘या’ खड्डयाला राष्ट्रीय खड्डा घोषित करण्याची उपरोधिक मागणी !

'त्या' अधिकाऱ्यांनाही द्या एखादा राज्यस्तरीय पुरस्कार.

 

शिरुर : शिरुर न्हावरा रोडवरील कानिफनाथ फाट्याजवळ मोठा खड्डा पडला असून, त्याला राष्ट्रीय खड्डा घोषित करण्यात यावा अशी या रोडने गाड्या चालवणाऱ्या तमाम वाहन चालकांची मागणी आहे…
तसेच सालाबादप्रमाणे दरवर्षी अतिशय दर्जेदार पद्धतीने हा राष्ट्रीय खड्डा दुरुस्ती करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला व त्याचे बिल मंजूर करणाऱ्या व कामाचा दर्जा तपासणी करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एखादा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी या रोडने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून होत आहे…
सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांची ही उपरोधिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून ती चर्चेचा विषय ठरली आहे.

काय आहे ती नेमकी पोस्ट ते पाहू या.
खड्डयाच्या नावाने नागरिक विनाकारणच ओरड करत आहेत…
या खड्डयामुळे शहरात व गावोगावी कितीतरी उद्योगधंदे भरभराटीस आले आहेत आणि इतर कितीतरी फायदे आहेत, त्याचा विचार करा…
१) खड्डयामुळे मानेचे बेल्ट, पाठीचे बेल्ट, कमरेचे बेल्ट, आयोडेक्स, झंडू बाम व इतर वेदनाशामक औषधीची विक्री वाढली, आर्थोपेडिक डॉक्टरांकडे प्लास्टरसाठी रांगा लागु लागल्या, पर्यायाने काही डॉक्टरांची होणारी उपासमार थांबली…
२) गाड्यांचे स्पेअर पार्ट्स, पाठे सस्पेंशन आदि रिपेअर करणाऱ्या रस्तोरस्तीच्या गॅरेजच्या लोकांना रोजगार वाढला…
३) खड्डयामुळे लोकांच्या वाहनांचा वेग कमी झाला, अपघात कमी झाले, शिवाय लोकांना घाईगड़बड़ न करता वाहनं सावकाश व काळजीपूर्वक चालवायची सवय लागली…
४) अपघात करून पळून जाणारी वाहने फक्त थोडाफार पाठलाग करून धरता येऊ लागली, व ड्रायव्हरची कणिक तिंबावी तशी मालिश करता येऊ लागली…
५) मन एकाग्र करण्यासाठी योगा करण्याची आवश्यकता नाही राहिली, फक्त खड्डयाचा विचार केला की मन अगदी एकाग्र होते…
६) दररोज ऑफिसला जाणा-यांना आजारपणाच्या सुट्यांमुळे का होईना, कुटुंबाबरोबर वेळ घालवता येऊ लागला…
७) सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे जवळपास जाण्यासाठी माणूस गाड़ी न वापरता पायीच चालू लागला, त्यामुळे चालण्याचा व्यायाम तर होतोच..
पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला आवश्यक असणाऱ्या इंधनाचीही बचत होऊ लागली…!!
आणि खड्डे कुठे नाहीत …!!
खड्डे तर चंद्रावर सुद्धा आहेत …!!
आणि प्रत्येक माणसाचे स्वप्न असते चंद्रावर जाण्याचे, त्यासाठी अगोदर सराव आवश्यक असतो …!!
तेंव्हा आपला सराव चालू ठेवा,
उगाच सरकारला दोष देऊ नका …!!