Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत झाले सत्तांतर !

रोहोकले गटाचा अध्यक्ष, तर तांबे गटाकडे उपाध्यक्षपद.

 

नगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत गुरूमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाकडून सहा संचालक अचानक रावसाहेब रोहोकले गटाकडे गेल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत सत्तांतर झाले.
अध्यक्षपदाच्या निवडीत तांबे गटाचे उमेदवार किसन खेमनर (संगमनेर) यांचा रोहोकले गटाचे उमेदवार अविनाश निंभोरे (श्रीगोंदा) यांनी सहा मतांनी पराभव केला.तर तांबे गटाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार गंगाराम गाडे हे बिनविरोध झाले आहेत.
जिल्हा शिक्षक बँकेच्या नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (काल) संचालक मंडळाची सभा बोलविण्यात आली होती. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर होते. बँकेच्या सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत रोहोकले आणि तांबे गटाचे संचालक उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बापूसाहेब तांबे गटाकडून खेमनर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गुरूमाऊली मंडळाच्या रोहोकले गटाकडून अविनाश निंभोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी झालेल्या गुप्त मतदानात अविनाश निंभोरे यांना १३ मते मिळाली तर सत्ताधारी तांबे गटाला अवघी ८ मते मिळाली.
दरम्यान,रोहोकले गटाकडून या निवडीसाठी घोडेबाजार झाल्याचा आरोप तांबे गटाकडून करण्यात आला आहे तर,घारगावचे सुपुत्र अविनाश निंभोरे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे तालुक्यातील सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.