शिरूर : आदित्य संदीप चोपडा (वय 24) राहणार हुडको कॉलनी शिरूर याचा मृतदेह काल संशयास्पदरित्या नारायणगव्हाण रस्त्यालगत असणार्या विहिरीत सापडल्याने या घटनेचा सखोल तपास करून जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी शिरूर शहर व पंचक्रोशी वासियांच्यावतीने आज (३०) रोजी सायंकाळी ६ वाजता ‘जस्टीस फॉर आदित्य कॅन्डल मार्च’ चे आयोजन केले आहे. या कॅण्डल मार्च नंतर शिरूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे.
हा कॅण्डल मार्च आदित्य चोपडा यांच्या राहत्या घरापासून निघणार असून हुडको कॉलनी ते जिजामाता गार्डन ते मधुबन हॉटेल रोड ते विसावा हाॅटेल समोरून जैन स्थानक कापडबाजार मार्गे पोलीस स्टेशन येथे जाणार आहे. शिरूर शहर पंचक्रोशी येथील नागरिकांनी आदित्य चोपडा याच्या गुन्हेगारांना अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे.
शहरात हुडको वसाहत येथे आदित्य चोपडा हा तरुण गेल्या तीन दिवसापूर्वी २७ सप्टेंबर रोजी शिरूर येथून आपल्या नारायणगव्हाण पारनेर येथे कामावर गेला होता. त्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला. त्याचे अपहरण झाल्याची अफवा मोठ्या प्रमाणात होती. परंतु काल सकाळी दि. २९ सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह रस्त्याचे काम सुरू असलेल्या जवळच असलेल्या विहिरीमध्ये आढळून आला.
यानंतर पोलिसांनी हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यास नकार देऊन पुणे-नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
त्यानंतर पोलीस अधिक्षक अजित पाटील नगर ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके या सर्वांनी नातेवाईकांची समजूत काढून याबाबत सखोल तपास केला जाणार अशी ग्वाही दिल्याने अखेर या तरुणाच्या शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला.दरम्यान, काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आज पोलिसांनी दिली.