Take a fresh look at your lifestyle.

शरद पवार,नितीन गडकरी शनिवारी नगरमध्ये एकाच व्यासपीठावर !

जिल्हा विकासाच्या घोषणेकडे लक्ष.

 

अहमदनगर : केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोन्ही नेते नगरमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. निमित्त आहे, करमाळा महामार्ग व बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी नगरमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या दोन्ही नेत्यांकडून नगर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात काय घोषणा केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. हा बाह्यवळण रस्ता चौपदरी होणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाने सुमारे ९५० कोटी रूपये मंजूर केले आहेत. तर नगर-करमाळा महामार्ग सध्या दोनपदरी असून हा महामार्ग चौपदरी करण्यात येणार आहे. सोलापूरपासून करमाळ्यापर्यंतच्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. नगर ते करमाळा या टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
नगर ते सोलापूर या महामार्गाचे चौरपदरीकरण दोन टप्प्यात करण्यात येत असून त्यासाठी केंद्र शासनाने ९८० कोटी व १ हजार २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. बाह्यवळण व नगर- करमाळा महामार्ग, ही दोन्ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहेत. या दोन्ही विकासकामांचा शुभारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत आहे.