महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठीच भाजपाचे ‘ईडी’चे सुडाचे राजकारण !
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा आरोप.
पारनेर : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करून राज्य सरकार पाडण्यासाठीच इडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केला.दरम्यान् आमदार निलेश लंके यांच्या रुपाने तरूण पिढीला आकर्षित करणारे नेतृत्व राष्ट्रवादीला पक्षाला मिळाले असल्याचे गौरोद्गारही पाटील यांनी काढले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्यात पारनेर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जलसंपदा मंत्री पाटील बोलत होते आमदार निलेश लंके राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख राष्ट्रवादी विद्यार्थी चे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे अशोक सावंत आदी यावेळी उपस्थित होते
प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे. यासंबंधी एक हिंदी भाषेतील संभाषण असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्या क्लीपमध्ये बोलणाऱ्यांनी राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिर करण्यासाठी डाव आखल्याचे स्पष्ट होते. तेंव्हापासून हे प्रकार वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना तसेच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं उदाहरण घेतले तर ज्या जागेसंबंधी आरोप आहे. त्या जागेची खरेदी त्यांच्या जावयाकडून रितसर झाल्याचे दिसून येत आहे. जी जागा एमआयडीसीने ताब्यातच घेतली नव्हती. ती मूळ मालकाने खडसे यांच्या जावयाला विकली आहे. त्यांनीही बँकेचे कर्ज काढून ती घेतली. कर्जाची परतफेडही हप्ताने केली आहे. त्यामुळे येथे काळ्या पैशाचा संबंध येतोच कुठे, असेअसूनही खडसे यांच्यावर त्यासंबंधीचे आरोप करण्यात येत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या बाबतीतही तेच झालं आहे. दुसऱ्या कोणाच्या तरी संभाषणातील उल्लेखावरून देशमुख यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. असे आरोप होत असले तरी आम्ही डगमगणार नाही असे सांगत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना या सर्व यंत्रणांच्या कारवाईची माहिती आधीच कशी मिळते? हेच संशयास्पद आहे,’ असेही पाटील म्हणाले.
पंतप्रधान मोदी सरकारने केलेल्या इंधन दरवाढ तसेच शेतीमालाचे भाव देखील कमी केल्याने शेतकरी वर्ग डबघाईला आला आहे असे सांगत जलसंपदा मंत्री पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरीवर्ग व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी एकसंधपणे पक्ष संघटना वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणूकीत पक्षाची ताकद दाखवून द्यावी असे आवाहनही पाटील यांनी केले.
आमदार निलेश लंके यांचे कौतुक करताना मंत्री पाटील म्हणाले की,आमदार लंके यांनी देशात न भूतो न भविष्यती असे कोविड सेंटर सुरू केले. लोकसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तरुण पिढीला आकृष्ट करणारे हे नेतृत्व तयार झाले असून लंकेमुळे महाराष्ट्रात सर्व सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश गेल्याचेही पाटील यांनी सांगितले. विकास तर होतच असतो परंतु आमदार लंके यांच्या विकासपर्वाला मानवता आणि माणुसकीचा चेहरा असल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे हा तालुका ओळखला जातो यापुढील काळात लंके यांच्यामुळे तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. राळेगण-सिद्धी परिसर व पठारी भागाला पाटाचे पाणी देण्यासाठी आ. लंके यांचा पाठपुरावा सुरू आहे. यासाठी आपणही प्रयत्नशील असल्याचे आश्वासनही पाटील यांनी दिले.
राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार , जितेश सरडे,सुभाष लोंढे, गजानन भांडवलकर, विक्रमसिंह कळमकर,राजेश्वरी कोठावळे, पुनम मुंगसे,बाळासाहेब खिलारी, ऍड.राहुल झावरे,विजुभाऊ औटी सुदाम पवार ,अशोक रोहोकले, डॉ.बाळासाहेब कावरे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
आमदार निलेश लंके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दैनंदिन घडामोडी पक्षाची ध्येयधोरणे व महाविकास आघाडी सरकारचे हिताचे निर्णय यासंबंधीची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने सुदेश आबुज यांनी तयार केलेल्या ‘पारनेर लोकनेता’ या न्यूज पोर्टलचा शुभारंभही यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.