Take a fresh look at your lifestyle.

“त्या” युवा उद्योजकाचा मृतदेह विहिरीत सापडला !

हत्या की आत्महत्या ? पोलिस तपास सुरु.

 

 

पारनेर : शिरुर येथील युवा उद्योजक आदित्य चोपडा गेल्या दोन-तीन दिवसापासुन बेपत्ता होते. आज (बुधवारी ) दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह नारायणगव्हाण येथील नगर -पुणे महामार्गालगतच्या विहिरीत आढळून आला आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, मृतदेह सापडल्यानंतर मृत उद्योजकाच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
यासंदर्भात सुपा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळ पारनेर तालुक्यातील कडूस येथील रहिवाशी असलेले चोपडा परिवार व्यावसायानिमित शिरुर (घोडनदी) जि. पुणे येथे स्थायिक झालेला आहे. या परिवारातील युवा उद्योजक आदित्य चोपडा गेल्या दोन दिवसापासुन बेपत्ता असल्याची फिर्याद कुटुंबियांनी सुपा पोलिस स्टेशनला केली होती.
सुपा पोलिसांनी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदवून तपास चालू केला होता. बुधवार दि .२९ सप्टेंबर २०२१ रोजी काही तरुण बबन धोंडीबा नवले यांच्या विहरीजवळ गेले असता तेथे एक मृतदेह आढळून आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती जवळील नागरिकांना व सुपा पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली असता मृतदेह चोपडा याचा असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत तात्काळ नातेवाईकांना कळविण्यात आले. मृत व्यक्तीच्या नातेवाईक तेथे आल्यावर त्यांनी आक्रोश करत अहमदनगर पुणे महामार्गावर नवले मळा येथे रास्ता रोको अंदोलन केले. मृताचे नातेवाईक व जमा झालेल्या नातेवाईकामुळे महामार्ग बंद होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
सुपा पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात रवाना केला. उशीरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालु होते , तर शवविच्छेदन अहवालवरुन पुढील तपासाची दिशा ठरवली जाईल असेही पोलिसांनी सांगितले.

व्यवसायाने ठेकेदार असलेल्या आदित्य चोपडाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हत्या की आत्महत्या? अशा दोनही बाजुने पोलिस तपास करत आहेत .