Take a fresh look at your lifestyle.

विचारच तारक आणि मारकही !

विचारांनी विकारावर नियंत्रण ठेवणारालाच आनंदी जगता येईल.

 

दुःख उगाळत बसायचं,त्यावर सहानुभूती मिळाली की मनशांती करुन घ्यायची मानवी तऱ्हा आहे.पण यामुळे शरीरात सतत दुःखाची भावना जोपासल्याने मेंदुतुन शरिरभर नको ती रसायणं तयार होऊन पसरतात. पौष्टिक खाऊन,व्यायाम करुन निरोगी रहाता येत नाही हे काही आता लपुन राहिले नाही. सुरुवातीला सौम्य वाटणारे विकार उग्र रुप धारण करतात तेव्हा कुठे आपण जागे होतो.पित्तीय विकाराचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. परंतु त्यातून मी मुक्त झालो हे आनंदाने मला आज सांगता येत आहे. नको त्या विचारांची गर्दी आयुष्यमान घटवते.मात्र विचारांची गर्दी आपोआप होत नाही हे लक्षात घ्या.

अपयशाचा सामना,आर्थिक तान,नात्यांमधल्या कुरघोड्या,व्यावसायिक, नोकरीतील ताणतणाव हे सारं त्यामागचं मुळ कारण आहे.

पण कितीही कठीण परिस्थितीत मार्ग काढता येतो.त्यासाठी गमावण्याची ताकद अफाट करावी लागते.शेवटी सोबत काहीच येणार नाही. हा डायलॉग आमच्यावर काहीच परिणाम करीत नाही.कारण हे सांगणाराही जमेल तसं मिळवण्यासाठी झटत असतोच.आम्हाला विट येत नाही ही शोकांतिका आहे.

एखादा पदार्थ वारंवार खायला मिळाला की त्याचा विट येतो.तो समोर दिसला तरी मळमळ होते.पण प्रपंचात असं होत नाही. लहान मुलाला अग्नीजवळ नेले की ते अग्नीत सहज हात घालते पण चटका बसल्यावर पुन्हा ते अग्नीजवळ जात नाही. आम्हाला प्रपंचात वारंवार चटके बसतात.पण पुन्हा तिकडे जाऊ नये असं कधीच वाटत नाही.सतत काही तरी मिळवायचय ही भावना आयुष्यभर जपली जाते.त्यामुळे खाल्लेल्या अन्नातुन मिळणारी सर्वाधिक उर्जा फालतु विचारांचा निचरा करण्यातच कामी येते.

या प्रक्रिया सतत घडत रहातात पण यामुळे आयुष्यमान घटत आहे,नवनवे विकार बसल्या जागेवर शरीर धारण करीत आहे. हे डोळ्यांना न दिसणारं सत्य आहे. त्यामुळे सतत चांगल्या विचारांचं चिंतन मनात घडत रहाण्यासाठी जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. नामचिंतन हा त्यावरचा प्रभावी उपाय आहे.यामुळे आयुष्य वाढेल असा गैरसमज होऊ नये.पण नामचिंतनाने मन प्रसन्न राहिल.मिळालेले श्वास आनंदाने उपभोगता येतील.विकाररहीत जीवनापासून आम्ही खूप दुर चाललो आहोत.थोडा जरी प्रयत्न करता आला तर आनंद आभाळभर आहे.विचारांनीच अविचारांवर विजय मिळवण्याची कला आत्मचिंतनाने प्राप्त होते.

रामकृष्णहरी