Take a fresh look at your lifestyle.

कृष्णार्पणमस्तु म्हणजे काय?

आपण हे शिकायलाच हवं?

 

आपण केलेल्या कर्माचे त्यातही ते शोभनिय असेल तर कर्तेपणाचं तुनतुणं वाजवत असतो.हे अमुक काम मी केलं आहे, माझ्यामुळेच ते झालं आहे.त्याचा डांगोरा पिटला जातो.कधी स्वतः तर कधी दुसऱ्याकडुन तो पिटवून घेतला जातो.यामुळे अवैचारीक जडत्व तयार होते.सतत वाहवा ऐकण्याचं व्यसनच लागतं.यातुनच प्रत्येक कर्माची फलप्राप्ती चांगलीच किंवा अमुकच मिळाली पाहिजे असा आत्मिक अहंकारयुक्त हेका सुरू होतो.पण इच्छित फलप्राप्ती झाली नाही कघ त्या दुःखाला पारावर रहात नाही. यातून अनेक व्यक्ती आत्महत्याग्रस्त होतात.

शास्र सांगतं की प्रत्येक कर्म पुर्ण झाल्यावर कृष्णार्पणमस्तु म्हणावं.म्हणजे फळप्राप्तीची आसक्ती तयार होत नाही. पण कृष्ण समजल्याखेरीज कर्मफल कृष्णाला अर्पण कसं करता येईल?चला तर मग कृष्ण समजून घेऊया.

कृष्ण कोण आहे?

पहिल्या शिवीला शिरच्छेद करण्याचं सामर्थ्य असताना शिशुपालाच्या नव्व्यान्नव शिव्या ऐकुन घेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामधे आहे तो कृष्ण आहे.

सुदर्शन चक्र धारण केलेले असतानाही जो बासरी हीच आपली ओळख करतो तो कृष्ण आहे.

द्वारकेचा राजा म्हणजे स्वयं द्वारकाधीश असुनही सुदामा सारखा दरिद्री मित्र आल्याचं कळाल्यावर अनवाणी पळत जाऊन मिठी मारण्याची प्रेमाशक्ती असणारा कृष्ण आहे.

कालिया सर्पाच्या काळकक्षेत असतानाही जो नृत्य करु शकतो तो कृष्ण आहे.

दुर्योधनाचं पंचपक्वान्न भोजन अव्हेरुन विदुराच्या कण्या खाऊन सत्याची सात्विक मर्यादा पाळणारा कृष्ण आहे.

सर्व शक्तिमान असुनही हातात शस्त्र न घेता अर्जुनाचं सारथ्य करु शकणारा केवळ कृष्ण आहे. अशा महाबलशाली तरीही सत्याचा कैवार घेणाऱ्या कृष्णाला कर्म अर्पण करणे म्हणजे कृष्णभाव जपणे आहे.कृष्ण शक्तीचा स्विकार करणे म्हणजे कर्ता मी नाही,कर्ता भगवंत आहे. हा भाव जोपासणे.साक्षीभावाने कर्म करणे म्हणजे कृष्णार्पण करणे होय.सुरुवातीला कठीण वाटेल पण अनुभवाने पटेल.मग कोणत्याही कर्माचं फळ आनंदानं वेडं करणार नाही की दुःखानं हतबल करणार नाही.

सर्वकाही करण्याची क्षमता असुनही आपल्याच मस्तीत कसं जगावं हे शिकवणारा कृष्ण आहे. आपण प्रयत्न करीत राहिलं की हळूहळू स्विकारले जाईल.

रामकृष्णहरी