Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांचा’ शेवटचा दिस हरीनामातच गोड झाला !

महाराष्ट्रातील 'या' प्रसिद्ध कीर्तनकारांनी ठेवला देह.

 

धुळे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे येथे कीर्तन सुरू असतानाच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताह निमित्त सातव्या दिवशी (दि, २७) त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
ताजोद्दीन महाराज यांना कीर्तन सुरू असतानाच हृदय विकाराचा झटका आला आणि ते अचानक खाली कोसळले. यानंतर स्थानिक मंडळी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहनिमित्त हरिभक्त परायण ताजोद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तेंव्हा ते म्हणाले होते, की मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल. तो योगायोग महाराजांच्या जीवनात घडून आला. साक्री तालुक्यातील जामदे, या गावात ज्ञानेश्वरी पारायणनिमित्ताने सुरू असलेल्या कीर्तनात महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असताना महाराजांनी रस्त्यातच देह ठेवला. या दोन्ही घटनांचे साक्षीदार असलेल्या हभप संदीप महाराज वसमार यांनी सांगितले, की माझ्या डोळ्यासमोरच या दोन्ही घटना घडल्या. हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात आला. शेवटी हेच म्हणावे लागेल, की ‘शेवट तो भला बहू गोड झाला.’
ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायिक कार्याची सुरुवात औरंगाबाद शहरातून केली होती. कीर्तन, भारूडे, गवळणी व रामायण कथा याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संत साहित्याबरोबरच, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर यांच्यासंदर्भातही ते आपल्या कीर्तनातून भाष्य करत. समाज प्रभोधन हा विषय ते आपल्या कीर्तनात प्रामुख्याने घेत.
महाराज हिंदू धर्माबरोबरच मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मातीलही महत्वाच्या गोष्टींवर भाष्य करत. एवढेच नाही, तर मी मुस्लीम धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू धर्मातच मरणार, असे ते नेहमीच कीर्तनातून सांगत असत. मला हे दोन्ही धर्म प्रिय आहेत. जन्माला आलो म्हणून मुस्लीम तर संत साहित्याच्या स्पर्शामुळे हिंदू धर्म मला फार प्रिय आहे आणि त्या धर्मातच मी मरणार आहे, असेही ते म्हणत.
ताजोद्दीन महाराज यांचे कार्य खूप मोठे होते. धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केले, अशी भावना वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र यांनी व्यक्त केली आहे.