Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकांना वैयक्तिक कामांकरीता ‘झेडपी’त यावे लागणे ही अभिमानाची बाब नाही !

आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मत.

 

शिरूर : प्राथमिक शिक्षकांना वैयक्तिक कामांकरीता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जिल्हा परिषदेत यावे लागणे हि बाब जिल्हा परिषदेच्या दृष्टीने निश्चित अभिमानास्पद नाही.त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेने प्रलंबित कामाचा निपटारा जलदगती करायला हवा असे मत विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.
शिरूर शहर प्राथमिक शिक्षक मित्र मंडळ व पारनेरकर सामाजिक विकास संस्था यांच्या विद्यमाने शिरूर येथे गुणवंत शिक्षक गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. तांबे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले हे होते.
शिक्षक बँकेचे संचालक अविनाश निंभोरे, विस्ताराधिकारी राजेंद्र पवार , भाऊसाहेब डेरे , उपाध्यक्ष संजय शेळके, गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, सुनील दुधाडे, संतोष खामकर, बाबा धरम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की,शिरूर शहरात राहणारा अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक येथे राहून देखील एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होऊन एकमेकांना आधार देण्याचे काम करत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे सांगत समाजाला दिशादर्शक अशा कामातून प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्याबरोबर मी कार्यरत असून तुमच्या सर्वांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका भविष्यामध्ये सरकारकडून घेतली जाईल.
राज्यातील शाळा सुरू करणे बाबत संघटनेने घेतलेली भूमिका सकारात्मक असून याबाबत सरकारने गांभिर्याने विचार करायला हवा. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही डॉ.तांबे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना रावसाहेब रोहोकले म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरही आपण डॉ. सुधीर तांबे यांसारख्या माणसांकडून काम कसे करावे याबाबत शिकवण घेत आहोत. कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र पोटे, तुकाराम आडसुळ, रामदास नरसाळे, शोभा कोकाटे यांचा तसेच सलाम बॉम्बे या संस्थेमार्फत राज्यामध्ये पाचव्या क्रमांकाने गौरविण्यात आलेल्या व्यसनमुक्तीच्या शॉर्ट फिल्म मधील कलाकार परशुराम सोंडकर, बाळू तरटे,संजय शिर्के, छगन चेडे, हरी साळुंखे, शॉर्ट फिल्मचे निर्माते ओंकार पोटे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त शिक्षक अनुक्रमे शोभा लाळगे संतोष साबळे, श्रीमती संगीता भदे यांना डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर इंगळे तर आभार श्री.रासकर यांनी मानले. कार्यक्रमास शिरूर शहरातील प्राथमिक शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत असलेली खाती बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये उघडण्याबाबत राज्यस्तरावरून आदेशित केले असून हे शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी प्रास्ताविकामध्ये केली. या मागणीची तात्काळ दखल घेऊन डॉ. तांबे यांनी मंगळवारी मंत्रालयामध्ये शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या समवेत बोलून सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात येईल अशी ग्वाही दिली.