Take a fresh look at your lifestyle.

स्वतःचा गौरव करताना काळ्या किनारीची आठवण असली पाहिजे !

अहंकार सत्य वदवु देत नाही.

 

मनुष्य दुःखाच्या तावडीतून निसटला की मी त्यातला नाहीच अशा अविर्भावात तो वावरत असतो.सुस्थितीत जीवन जगताना आपलं पुर्वायुष्य काळवंडलेलं असेल तर ते उगाळत बसु नये.पण तशा अवस्थेत आत्ताच्या घडीला कुणी असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी किमान आपला काही अनुभव आणि प्रयत्नांचा मार्ग तरी दाखवायचं धाडस करायला हवं.आपण स्वतः त्या चिखलात रुतलो होतो हे सागण्याचं धारिष्ट्य म्हणजे वैचारिक नितीधर्माचं आपल्या अंगी असलेलं सामर्थ्य.
एक पेशंट डॉक्टरांकडे गेला त्याचे पोट खुपच दुखत होते.पण जेव्हा डॉक्टर म्हणाले माझंही असं पोट दुखत होतं पण मी आता बरा झालो आहे हे ऐकल्यावर पेशंट पन्नास टक्के तेथेच बरा झाला.हे डॉक्टरांचं कसब आहे. पेशंट बरा करण्यासाठी ते स्वतः त्या पंक्तीत जाऊन बसले.हे भलाईचं सामर्थ्य आहे.हे सामर्थ्य आपली कमकुवत बाजु आहे असं अनेकांना वाटेल.आपलं कमीपण मुखातून बोलणं हे अनन्यसाधारण मनुष्य लक्षण आहे.आपल्या अपयशाच्या कथा कुणाला तरी जगण्याचं बळ देतील.ते वाटण्याचं दैवीबळ आमच्याकडे असलं पाहिजे.
यशाच्या कथा सांगणं फारच सोपं आहे. ते सांगताना मी किती कष्ट केले याच्या कथा रंगवून सांगता येतात.पण सत्य त्याहून कठीण असतं.काही लाजवणाऱ्या घटना घडलेल्या असतातच.त्या झाकण्यातच भलाई आहे असं आपलं मन वारंवार सांगत असतं.पण तिच घटना अविचाराच्या दारिद्र्यात चडफडणाऱ्या कुणाचा तरी दिपस्तंभ ठरु शकते.पण असं वदवणारा सहसा भेटत नाही. आपला अहंकार असं करण्याची परवानगी देत नाही.कोणत्याही विषयात यश संपादन करु पहाणाऱ्या प्रत्येकाने त्या क्षेत्रातल्या यशस्वी व्यक्तींच्या अपयशाच्या कथा ऐकल्या पाहिजेत.असा ऐकवणारा मिळणं हे ही भाग्यच म्हणायचं.आपल्या पुर्वायुष्यातली वाईट घटना आणि त्यातुन तावुन सुलाखून निघाल्यावर गाठीशी असलेला अनुभव अनेकांना तारणारा ठरतो.पण त्यामुळे आपलं अधःपतन होईल ही भिती व्यर्थ आहे.
तुमचं तेज त्यामुळे अजुनच वाढेल.पाय जमिनीवर ठेवून चालण्याची शक्ती वाढेल.अहंकार ताब्यात राहिल.हा प्रयत्न मी सतत करीत आहे. आपलं उणेपण आपणच सांगण्याचं सामर्थ्य कधी गमवायचं नाही हा माझ्या गुरुदेवांचा प्रसाद आहे.आपल्याकडेही असा अनुभव असेल तर आपणही गरजुंना तो अनुभवसिद्ध प्रसाद वाटावा.त्यानं आपलं कधीच नुकसान होणार नाही.
रामकृष्णहरी