Take a fresh look at your lifestyle.

दैव बलवत्तर : घरावर वीज कोसळली; कुटुंब बालंबाल बचावले !

वडनेर हवेली येथे घडली अशी घटना की...

पारनेर : तालुक्यात काल (रविवारी) झालेल्या जोरदार पावसामध्ये वडनेर हवेली येथील सुभाष बबन बढे यांच्या घरावर रात्री साडेनऊच्या दरम्यान वीज
कोसळली. यामुळे संसारपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेजारच्या खोलीमध्ये हे कुटुंब झोपलेले असल्यामुळे या दुर्घटनेत कुटुंब बालंबाल बचावले आहे.
सुभाष बबन बढे व ताराबाई सुभाष बढे हे रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान शेजारच्या खोलीत झोपलेले असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन घरावर मोठा जाळ पडला. यात घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून घर पूर्णपणे उध्वस्त झाले. सरपंच लहू भालेकर यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. कामगार तलाठी मोहिनी साळवे यांनी पंचनामा केला असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासकिय
नियमाप्रमाणे अहवाल पाठविला असल्याची माहिती दिली.यावेळी सरपंच लहू भालेकर,माजी सरपंच दादाभाऊ भालेकर,उपसरपंच नंदू भालेकर, विकास गाडे,भाऊसाहेब कुटे,ग्रामपंचायत सदस्य तात्याभाऊ भालेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रविवारी रात्री दोनच्या दरम्यान वडनेर हवेली परिसरात झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती सरपंच लहु भालेकर यांनी दिली आहे. तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्यावतीने तातडीने करण्याची मागणी करण्यात आली.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामध्ये शोभा वसंत भालेकर या विधवा महिलेच्या घराची मोठे नुकसान झाले होते. यासंबंधीचा महसूल यंत्रणेच्यावतीने पंचनामा करण्यात आलेला आहे परंतु, दोन महिने उलटूनही या विधवा महिलेला उद्यापर्यंत आपत्कालीन विभाग किंवा महसुली यंत्रणेच्यावतीने कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आलेली नाही.
लहू भालेकर
सरपंच वडनेर हवेली.