Take a fresh look at your lifestyle.

पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीत कसा झाला झोल ?

आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात 'या' बाबी झाल्या उघड !

 

 

✒️ देविदास आबूज
पारनेर: भाजपाचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरणी थेट देवीभोयरे येथे कारखाना कार्यस्थळावर भेट देऊन सभासद शेतकरी व कामगारांशी चर्चा करून लक्ष घालण्याचे आश्वासन दिले तर कारखाना बचाव कृती समितीने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कारखान्याच्या चौकशीसाठी येत नसल्याचा आरोप करीत यासाठी पाठपुरावा करणाऱ्या समितीच्या सदस्यांनी ईडीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर ‘पारनेर’ कारखाना राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. जाणून घेऊ या नेमके काय आहे हे प्रकरण ?
क्रांती शुगर पॉवर लिमिटेड या खाजगी कंपनीने मालमत्ता व भांडवल नसताना देखील पारनेर साखर कारखान्याची 32 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. याबाबत लेखापरीक्षण अहवालात खरेदी विषयी वापरलेल्या रक्कमेवर संशय निर्माण करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँकेने पारनेर कारखान्याची विक्री बोगस करण्यात आली असून एकाच निविदेत कारखान्याची विक्री केलीच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे ऑडिट 7 ऑगस्ट 2015 रोजी झाले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 8 ऑगस्टला पारनेर कारखान्याची निविदा भरली गेली तर 11 ऑगस्ट 2015 ला निविदाही लगेच मंजूर झाली मात्र,या व्यवहारात नियमानुसार कोणतीही रक्कम भरलेली नसल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले आहे. निविदा मंजूर केल्यानंतर 17 ऑगस्ट 2015 ला राज्य सहकारी बँकेने क्रांती शुगर या खाजगी कंपनीला रक्कम जमा करण्याविषयी पत्र पाठवल्याचेही आढळून आले आहे.पण या खाजगी कंपनीने 8 ऑगस्ट 2015 रोजी याच दिवशी सव्वातीन कोटी रुपये बयाणा रक्कम राज्य सहकारी बँकेकडील भरल्याचे म्हटले आहे.
पुढे काही दिवसांनी याच कंपनीला खरेदी खताच्या दिवशीच 28 कोटी रुपयांचे मोठे कर्ज राज्य सहकारी बँकेने मंजूर केले. सुमारे 32 कोटी रूपयांची मालमत्ता विकत घेताना सरकारला केवळ पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले. कंपनीच्या सोयीसाठी इतरही अनेक नियम मोडण्याचा आरोपही होत आहे. कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेले 23 कोटी रुपये उद्योजक अतुल चोरडिया,अशोक चोरडिया यांच्याकडून उसने घेण्यात आले होते.उर्वरित 9 कोटींची रक्कम अक्षर लँड डेव्हलपर्स यांच्याकडून घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात या सर्व बाबी आता उघड झाल्या आहेत. ईडीच्या चौकशीनंतर पारनेर साखर कारखान्याचे काय होणार याकडे सभासद शेतकरी व कामगारांचे लक्ष लागून आहे.