Take a fresh look at your lifestyle.

अनुभवाशिवाय केलेलं कथन म्हणजे गप्पाच !

बऱ्या वाईटाची पारख तटस्थ राहुन करता येत नाही.

 

 

आपण प्रसंगानुरूप येणाऱ्या घटनांवर आपली मतं मांडत असतो.आपणच योग्य बोलत आहोत असा आपला आवेश असतो.कोणत्याही गोष्टीवर आपलं मत मांडणं खरं तर अनेकदा बळजबरीने समोरच्याने मान्य करावं असाच प्रयत्न असतो.कारण त्याला स्वार्थ नावाची झालर असते.’मत’या शब्दाचं अवमूल्यन झालं आहे. आता मत म्हटलं की मतदान आठवतं.वास्तविक सहजावस्थेतलं सहज जगताना केलेलं भाष्य म्हणजे मत होय. ज्याला कोणताही स्वार्थाचा कंगोरा नाही. केवळ चांगलं व्हावं हा उदात्त विचार समोर असणं म्हणजे मत होय.खऱ्या खोट्याचा,बऱ्यावाईटाची खात्री करुन व्यक्त केलेलं मनोगत म्हणजे ‘मत’होय.
बऱ्यावाईटाची पारख अनुभव न घेता करता येईल ते असं म्हणणं म्हणजे गप्पा मारणे आहे. आपल्याला अनुभव नसताना केलेला उपदेश म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशी गत आहे. समाजाला उपदेश करण्याची उबळ प्रत्येकाला येते.उंच उंच वाक्यफेक करुन विचारांचं गारुड तयार करताही येईल.पण अनुभव सिद्धता काय? तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव।शब्दांचे गौरव कामा नये।। फेकफेकी मनोरंजन करील,पण परीवर्तन शक्ती त्यात नसतेच.
तुकोबाराय म्हणतात, या नावे अद्वैत खरे ब्रम्हज्ञान।अनुभवा वाचुन बडबड ते।।
अनुभवाशिवाय जे काही बोलाल ती बडबड आहे. त्याला काही अर्थच नाही. किंवा ती बडबड अर्थपूर्ण(धनलालसेने पुर्ण)असेल.द्वैतबुद्धि नष्ट झाल्याखेरीज ब्रम्ह साक्षात्कार होय नाही. आपलं आंतरिक’मत’प्रगट होत नाही.

अनुभव आले अंगा।ते या जगा देतसे।। अनुभवाशिवाय कितीही शाब्दिक ज्ञान मिळवलं तरी ते व्यर्थ आहे. तुकोबारायांची खात्री पटल्यानेच जगाला अनुभवसिद्ध गोष्टी सांगण्याचाच अट्टाहास ते करीत आहेत. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव।शब्दांचे गौरव कामा नये।। सत्यदेवाच्या संबंधाने अनुभव शब्दाचे आयोजन महाराजांनी केले आहे.
प्रापंचिक गतीने येणारे बोलही अनुभवसिद्ध असायला हवेत.बरेचदा आपण चुकीचे आदर्श स्विकारतो,चुकीची भलावन करतो,स्वार्थापायी हा मध्ये हा मिळवतो.पण या गोष्टी आनंद देऊच शकत नाहीत.त्यातही आपली मतं दुसऱ्यावर लादण्याची प्रत्येकाला घाई असते.सत्य अनुभव आणि त्यामधून तयार झालेलं भाष्यच आनंददायी असतं.इतरांना मार्ग दाखवणारं असतं.त्यामुळे आपणही मनोमन आनंद उपभोगत असतो.
रामकृष्णहरी