Take a fresh look at your lifestyle.

वडझिऱ्याच्या महिला डॉक्टराचा असाही प्रताप !

झेड.पी.च्या दोन नोकऱ्या स्विकारून केली फसवणूक ! 

 

 

 

पारनेर : वडझिरे आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजश्री पोपटराव ढवळे यांनी पुणे जिल्हयातील पिंपळवंडी, ता. जुन्नर या आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी म्हणून नोकरी स्विकारून शासनाची फसवणूक केली आहे. ढवळे यांनी वडझिरे व पिंपळवंडी येथील हजेरी पुस्तकांवर सहया करून दोन्ही उपकेंद्रांचे मानधनही लाटले आहे. वडझिरे ग्रामस्थांनी यासंदर्भात पुराव्यांसह पारनेर पोलिसांसह, जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे.
सरपंच निलेश केदारी, सदस्य संतोष दिघे, बाळासाहेब सपकाळ, युवराज मोरे यांनी केलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, १२ जानेवारी ते ११ जुलै २०२१ या कालवधीत डॉ. ढवळे या वडझिरे येथील उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पुढे १२ जुलै ते ११ ऑक्टोबरपर्यंत त्यांना नगरच्या जिल्हा परिषदेने मुदत वाढ दिलेली आहे. त्यांना दरमहा २५ हजार रूपये मानधन मिळत आहे. ढवळे यांना पदनियुक्ती देताना ही सेवा सोडून इतर ठिकाणी अर्धवेळ, पुर्णवेळ काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही डॉ. ढवळे यांनी आपल्या पदाचा व ज्ञानाचा गैरवापर करून, नेमणूक करताना दिलेल्या हमीपत्रातील अटी व शर्तींचे पालन न करता खोटी कागदपत्र तयार करून ती खरी आहेत असे भासवून अहमदनगर जिल्हा परिषद तसेच पुणे जिल्हा परिषद यांची फसवणूक करून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी नेमणूकीचे आदेश स्विकारले आहेत असे ग्रामस्थांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
डॉ. ढवळे यांनी एकाच वेळी नेमणूकीचे आदेश स्विकारून दोन्ही ठिकाणी, एकाच महिन्यात एकाच कालावधीमध्ये हजेरीपत्रकावर सहया करून वरीष्ठांची, कार्यालयाची दिशाभूल व फसवणूक केलेली आहे.दोन्हीकडे मानधनाची खोटी बिले तयार करण्यात आलेली आहेत. नगर जिल्हा परिषदेकडून दरमहा २५ हजार तर पुणे जिल्हा परिषदेकडून दरमहा ४० हजार मानधनाची एकाच वेळी बिले घेतली आहेत.
पिंपळवंडी ता. जुन्नर जि. पुणे येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी म्हणून दि. २७ एप्रिल २०२२ पर्यंत नेमणूकीचे आदेश स्विकारताना पारनेर तालुक्यातील अळकुटी केंद्रातील वडझिरे उपकेंद्रात सेवेत असतानाही ती बाब नमुद न करता आपल्या स्वहस्ताक्षरात दि. ३ जुन २०२१ रोजी पिंपळवंडी आरोग्य केंद्रात समक्ष हजर राहून रूजू रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे. दोन्हीकडील हजेरी पुस्तकांचे अवलोकन केले असता एकाच दिवशी हजर असल्याचे भासवून सहया देखल करण्यात आल्या आहेत.
डॉ. ढवळे यांच्या कार्यकाळात वडझिरे गावातील कोरोना रूग्णसंख्या एकदम वाढली. पर्यायाने गावाचा मृत्यूदरही वाढला. लसीकरणामध्ये हेतूपुरस्सर दिरंगाई, आरेरावीलाही ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. करोना काळात समाजासाठी उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने प्रत्येक गावाकरीता किंवा उपकेंद्राकरीता आरोग्य अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली. अशा स्थितीत डॉ. ढवळे यांनी शासनाच्या आदेशाचा दुरूपयोग केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान अशा प्रकारे अनेक ठिकाणी नेमणुका देऊन शासनाचा पैसा लाटणारे रॅकेट कार्यरत असण्याची शंकाही ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे.