अकोला: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लोकनेते शरद पवार यांच्या जन्मदिनी लोकार्पण केलेली रुग्णवाहिका स्थानिक विकास निधीतून घेतली असतानाही जणू त्यांच्या मालकीची असल्याचे दाखवत वापर केल्यावर ही बाब लक्षात येताच आरोग्य विभागाने ही रूग्णवाहिका ताब्यात घेण्याची कारवाई करून आमदारांना चांगलीच अद्दल घडवली असल्याचे उघड झाले आहे.
सदर रुग्णवाहिका ही कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी घेतल्याचे अनेकांच्या लक्षात आले होते. मात्र,सदर रुग्णवाहिका त्यांचे वडील दिवंगत रामकृष्ण आप्पा मिटकरी यांच्या स्मृतीत आमदारांनी पदरमोड करून घेतल्याचा अनेकांचा ग्रह झाला होता.तसबीर सुद्धा लावण्यात आली आहे.
रुग्णवाहिकेवर तसा उल्लेख असून,आतील भागात त्यांच्या वडिलांची शासनाच्या निधीतून खरेदी केलेल्या कोणत्याही मालमत्तेवर अशा प्रकारे उल्लेख आजवर राज्यात कुठेही झाला नाही.
मात्र, मिटकरी यांनी तसा उल्लेख करणे, दीर्घकाळ सदर वाहन जणू मालकीचे समजून स्वतःच्या गायवाड्यात उभे ठेवणे, एवढेच नव्हे तर त्यावर खासगी चालक नियुक्त करणे (त्याचा पगार हा स्वतंत्र विषय आहे) या प्रकाराचे कुटासा परिसरात नवल व्यक्त केले जात होते. या रुग्णवाहिकेचे संचालन आणि व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे देण्याचाही मिटकरी यांचा मनसुबा होता, परंतु त्यांच्याच ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीने त्याला नकार दिल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेली वर्षभर या रुग्णवाहिकेचे लॉकबुक मात्र कावसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाने वापरले जात असल्याचे लक्षात आल्यावर दीड महिन्यांपूर्वी ही रुग्णवाहिका आरोग्य खात्याने जमा करून आरोग्य केंद्रात उभी केल्याचे दिसत आहे.
निधी सरकारचा पर्यायाने जनतेचा आणि सोस मात्र पूज्य वडिलांची स्मृती जपण्याचा मिटकरी यांनी केलेला प्रयत्न शासकीय संकेत मोडणारा असून, स्थानिक विकास निधीतून असे घरगुती संबंध राज्यात कुठेही जपण्याचा प्रयत्न केला जात नाही हेही या निमित्ताने उघड झाले आहे.
मी बांधेल ते तोरण आणि म्हणेल ते धोरण हे सामान्य लोक जास्त काळ मान्य करीत नसतात याचा आता कुटासा परिसराला अनुभव येत असल्याची प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहे.