Take a fresh look at your lifestyle.

अखेर दीड वर्षांनंतर पडदा उघडणार !

राज्यातील चित्रपटगृह, नाटयगृह २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार !

 

मुंबई: शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे.

चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. २२ ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील.

जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल.
देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. बॉलिवूडला सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळतं. त्यामुळे ही मागणी करण्यात येत होती. अखेर आज याबद्दलचा निर्णय झाला.
खरं तर हा निर्णय घेण्यास उशीर झाला पण हरकत नाही नाट्यगृह बंद असल्याने लावणी कलाकारांसह सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती बिघडली होती. अनेक कलाकारांना आत्महत्या कराव्या लागल्या. किमान आता नाट्यगृह सुरू झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. अनेकांच्या हाताला काम मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच कलाकारांना आनंद झाला असून सरकारच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत करते, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लावणी कलावंत आणि निर्मात्या कीर्ती देशमुख यांनी व्यक्त केली.