Take a fresh look at your lifestyle.

चित्रपट निर्मात्याने पुरविली सुदर्शनची इच्छा !

नियतीच्या आघातानंतर 'त्याच्या'वर दु:खाचा लवलेशही नाही.

 

शिरूर: तालुक्यातील न्हावरे या गावच्या शेतकरी कुटुंबातील सुदर्शन जगदाळे ह्या तरुणाची आयुष्यातील एक मोठी इच्छा होती की मी एकदा तरी त्याच्या घरी यावे. प्रत्यक्ष त्याची भेट घेतल्यावर नियतीनं मोठा आघात करूनही दुःखाचा कुठेच लवलेश न दाखवता हसतमुख चेहऱ्याने माझं स्वागत करणारा सुदर्शन सारखा माझा एक फॅन माझ्या मित्र यादीत असल्याचा मलाच अभिमान वाटू लागला….
प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश टिळेकर यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात !
शिरूर तालुक्यातील न्हावरे गावाला तशी ही माझी पहिलीच भेट होती. या ठिकाणी माझ्यासाठी अस्सल ग्रामीण जेवणाचा बेत करण्यात आला होता. खास माझ्यासाठी बनवलेल्या मासवडीच्या कालवण मध्ये गरम बाजरीची भाकरी कुस्करून खाताना सुदर्शन आणि त्याच्या घरच्यांचा आग्रह न मोडता तीन भाकऱ्या कधी पोटात गेल्या ते कळलं नाही.
12 वर्षांपूर्वी सुदर्शन कॉलेजच्या मित्रांच्या बरोबर सहलीसाठी गोव्याला गेला होता.बीचवर मित्रांची धमाल चालू झाली,मित्र पाण्यात उतरले म्हणून सुदर्शन मित्रांचे फोटो काढायला पाण्यात उतरला आणि समुद्राच्या मोठ्या लाटेमुळे सुदर्शन पाण्यातच उलटा फेकला गेला. मणक्याला इतकी गंभीर इजा झाली की जवळपास पंधरा दिवस सुदर्शन कोमात होता,परमेश्वराची कृपा आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे जीव वाचला पण दुर्दैवाने अपंगत्व आयुष्य भरासाठी नशिबी आले. शारीरिक हालचालीवर मर्यादा आली,चालणे फिरणे बंद झाले.पण हार न मानता व्हील चेअरच्या सहाय्याने सुदर्शनने अपंगत्वावर विजय मिळवला आणि जिद्द आत्मविश्वास मनाशी बाळगून पुन्हा नव्या उमेदीने सुदर्शनने आयुष्याला सुरुवात केली.
सुदर्शनच्या वडिलांनी अपघाता नंतर सुदर्शनला अपंगत्व आल्यानंतर त्याला धीर दिला ” सुदर्शन अपघातामुळे तुला अपंगत्व आलं हे विसरून जन्माला येतानाच तू अपंग होता असं समज म्हणजे तुझं दुःख हलकं होईल”. मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आई वडील पाहिल्या नंतर मला त्यांचा अभिमान वाटला. सुदर्शन स्वतःच्या हाताने जेवणही करू शकत नाही “पोटच्या पोराला मी रोज माझ्या हातानं भरवते त्यात सुख आहे” हे मला आनंदाने सांगताना त्या माऊलीच्या डोळ्यातील जमा झालेले आनंदाश्रू पाहून मला त्या माऊलीचा हेवा वाटला.”तुमच्या सारख्या मोठ्या माणसाचे पाय आमच्या घराला लागले” असं म्हणत कौतुकानं माझ्या बरोबर फोटो काढून घेत कृतज्ञता व्यक्त करणारी ती साधी माणसं पाहून मनात विचार आला की आपण आयुष्यात काय जास्त कमावलं असेल तर हे असं साध्या माणसांचं प्रेम.जे वेळोवेळी मला माझे पाय जमिनीवर ठेवण्यास मदत करतं आणि अडचणीच्या वेळी,दुःखाच्या प्रसंगी बळ देत राहतं.