Take a fresh look at your lifestyle.

वर्तमानात सुख शोधण्याचा प्रयत्न चूकीचा नाही.

पण भविष्यात सुख येईल या आशेवर जगणं व्यर्थ आहे.

 

सद्यस्थितीत सुखासाठी खटपट करणे आवश्यक आहे. पण सुख म्हटलं की निर्भेळ,निष्कलंक,निष्कपट, आनंदयुक्त या आणि अशा अनेक उपाध्यांनी ते युक्त असलं तरच सुख शब्द परिपूर्ण आहे. आपल्या प्रापंचिक आवश्यक गरजा ओळखून धनाची व्यवस्था करता आली पाहिजे. म्हणजे उद्योग व्यवसायात वेळोवेळी दक्ष राहुन बदल करता आले पाहिजेत.परिस्थिती बदलण्यासाठी पैसा कमावता आलाच पाहिजे. पण…तो कमावताना अवलंबलेला मार्ग नैतिकता डावलणारा नसावा अन्यथा स्थैर्य मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करावा लागतो.
दुष्ट प्रवृत्तीचा अवलंब केल्यावर शरीराची होणारी वाताहत थांबवता येत नाही. बाह्यांगाने न दिसणारे अनेक विकार शरीर पोखरतात.असं म्हणता येईल की अंतर्गत पेटलेला अग्नी शरीर जाळत रहातो.यामागे शरीर विज्ञान आहेच.दुष्ट,वाईट,विनाशकारी विचार निर्मीतीने शरीरात विषारी द्रव्य पाझरतात.त्यापासून शरीर आजार बळावतात.त्याचा नायनाट करणारी,त्याला रोखणारी यंत्रणा अजुन तरी विज्ञानाला शोधता आली नाही.
वाईट प्रवृत्तीच्या शरीराचं बल नाहीसं करुन संपवणारी ही नैसर्गिक व्यवस्था अचंबित करणारी आहे.सुख मिळवताना कळत नकळत अशा गोष्टी घडतात.
तुकोबाराय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे।उदास विचारे वेच करी।।उत्तम ती गती तो एक पावेल।उत्तम भोगिल जीवखाणी।। अगदी तुकोबांचा विचार घेऊन तंतोतंत जगणं अशक्य जरी असलं तरी कोणत्याही कर्मात एक टक्का जरी जमला तरी खूप आहे. पापपुण्याचा हिशोब करण्याची आम्हाला सवय नाही. नव्हे ते शक्य होणार नाही अशीच स्थिती आहे. जीवो जीवश्य जीवनम हेच आमचं जगण्याचं तंत्र आहे.
दुसऱ्याला खाऊनच जगता येईल हा श्वापदांचा अधिकार आम्ही हिसकावला आहे.सिंह स्वतःला जंगलचा राजा म्हणून एकेकाळी मिरवायचा तोच आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडतोय.म्हणून माणसांकडून श्वापद विचारांचं प्रसारण होत आहे. बलात्काराच्या उच्चतम नोंदी होत आहेत.खुन,दरोडे,लुटमार नित्याचे झाले आहे. या धकाधकीच्या परिस्थितीत सुखाचा विचार शोधणे म्हणजे जंगलात सुई शोधण्यासारखे जरी असले तरी जगण्याचा पाया सुखच आहे हे सत्य बदलता येणार नाही.
जगाला बदलवता येणार नाही. आपणच आपल्यासाठी या विचारांची पेरणी करत रहायचं.
रामकृष्णहरी