Take a fresh look at your lifestyle.

धुंद हवा अन् कुंद गारवा…तरी पण माळशेजचा घाट वाटे सुनासुना !

कोरोना निर्बंधामुळे पर्यटकांनी फिरविली पाठ.

 

✒️ सतीश डोंगरे

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस… शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे… हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी … त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता… हे दृष्य आहे नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटातील. परंतू कोरोनामुळे पर्यटकांवर निर्बंध लादले गेल्याने गेले वर्षेभर हा घाट पर्यटकांअभावी सुनासुना वाटत आहे. 

जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव जोगा धरणाचा सुंदर जलाशय आहे.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’. फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या नगर,पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल. परंतू हे सर्व कोरोनाचे संकट दूर झाल्यावर. 

माळशेज घाटातल्या रेस्ट हाऊसच्या मागे हरिश्‍चंद्रगडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल ते ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी नियमांचे पालन करूनच. 

▪️माळशेजला कसे जाल?

नगरवरून आळेफाटा मार्गे तर पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. शहापुरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाट ला जाता येते.

हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल