मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. आरोपी नराधम हे अल्पवयीन मुलींना देखील सोडत नाहीत. त्यामुळेच राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून जवळ असलेल्या डोंबिवलीत तर प्रचंड संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने तर सर्वच हद्द पार केल्यात.
एका 15 वर्षाच्या चिमुकलीवर 29 जणांनी वेळोवेळी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी काही जणांचे नातेवाईक हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याच राजकीय वजनाचा माज मनात ठेवून आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
या सगळ्या घटनेवरून हे कायद्याचं राज्य आहे का?, असा सवाल भाजप नेत्या, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत सांगा आता थोबाड कोणाचं फोडायचं सरकारचं की, विरोधकांचं, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.