Take a fresh look at your lifestyle.

पेरले तेच उगवणार !

सुखात रमल्यावर त्याचा विसर पडतोच.

 

आपण शेतात जे पेरणार तेच उगवणार. तुम्ही म्हणाल यात नवल काय आहे?आपण शेतात काय पेरले हे चांगलेच ठाऊक असते.त्यामुळे बाजरी पेरली तर गव्हाचं पिक येईल असं ठार वेड्याला सांगितले तरी पटणार नाही,आणि तसं चमत्काराचं पिक येणारही नाही. शेत पिक हे तर उदाहरणादाखल आहे. खरं तर आपल्या सुपिक डोक्यात होणाऱ्या नापाक शेतीविषयी आपण आज बोलणार आहोत.
माऊली म्हणतात,
जैसे क्षेत्रीजे पेरीजे।ते वाचुनि आन न निपजे।कां पाहिजे तेचि देखिजे।दर्पणाधारे।।ना तरी कडेयातळवटी।जैसा आपुलाचि बोलू किरीटी।पडसादु होऊनी उठी।निमित्तयोगे।।४/७५कर्मसन्यासयोग
शेतात जे पेरणार तेच उगवते किंवा आपण जसे आहोत तसेच आरसा दाखवतो.अजुनही पुढे उदाहरण देताना माऊली म्हणतात,आपण डोंगर कड्याच्या पायथ्याशी जाऊन बोललो तर आपल्याच ध्वनीचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकु येतो.
जीवन सुंदर जगणे सुरू असले तर निश्चित पिक चांगल्या कर्माचं,विचारांचं घेतलं आहे असं समजावं.मागे जी कर्म झाली आहेत त्यावरच उद्याचं जीवन कसं असेल हे अवलंबून आहे. आरसा कधीच खोटं बोलत नाही. आपलं रुप जसं असेल तसं तो दाखवतो.आमचा कर्माचा आरसाही असाच आहे. आज एखाद्याचं वाईट करताना जेवढा आनंद वाटत असेल त्याच पटीत यातना परतफेडीत होणार हे निश्चित समजावे.किंवा चांगलं करताना जेवढा आनंद मिळणार आहे त्याचं पटीत आनंद उपभोगता येणार आहे.
डोंगर कड्याजवळ आपण बोलतो तोच प्रतिध्वनी ऐकु येतो त्यात कड्यालाही बदल करता येत नाही.म्हणुनच आपण जसं वागणार आहोत तशीच प्रतिक्रिया भोगावी लागणार हे अटळ सत्य आहे.माझं फार चांगलं चाललय हे सहज सांगता येतं,पण माझं फार वाईट चाललय असं सांगण्याची हिम्मत होत नाही. दुःख लपवण्याची इच्छा होते तिच मुळी वाईट कर्माची कुठतरी सल असते म्हणून.अंतरीक गडबड बाह्यांगाने झाकण्यात आम्ही पटाईत झालो असलो तरी प्रत्येक मनुष्याचा चेहरा हा त्याचा आरसा आहे.आपण चेहरा पाहुन समोरचा प्रसन्न आहे की दुःखी हे सहज ओळखतो.आपण दुःखी किंवा खुश असतो तेव्हा आपला मित्र असेल सहकारी असेल तो सहज म्हणतो,आज फार नाराज दिसताय ? किंवा आज फारच खुश दिसताय.असं आपण नेहमीच ऐकतो.पण आपला चेहरा आपलं आंतरीक जीवन दर्शवतोय याची जाणीव मात्र फारच कमी व्यक्तींना होते.
आमची विचारांची मशागत सतत होत रहायला हवी.वाईट विचार येतीलही पण ते झटकता आले पाहिजेत. हे आपोआप होणार नाही. त्यासाठी दुष्ट विचारांचं तन वाढल्याची जाणीव होणं गरजेचं आहे. अध्यात्म या क्रिया सुरू करतं आणि सुपिक विचारांचं पिक जन्माला घालतं.
रामकृष्णहरी