Take a fresh look at your lifestyle.

खरीपातील पिकांची नाफेडमार्फत हमीभावाने खरेदी करावी !

बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांची मागणी.

 

 

 

 

पारनेर : खरीप हंगामात शाश्वत उत्पन्न मिळवून देणाऱ्या सोयाबीन,मूग, उडीद या पिकांचे बाजारभाव घसरल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने नाफेड मार्फत हमीभावाने या पिकांची खरेदी करावी. त्यासाठी तालुका पातळीवर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी जिल्हा पणन अधिकारी एच.एल. पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. त्यामुळे सोयाबीन,मूग, उडीदच्या खरेदीदरात मोठी घट झाली आहे. दिवसेंदिवस दर कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने हमी भाव केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.
पारनेर बाजार समितीच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून हमी भाव केंद्र चालवण्यात येत आहे. सदर केंद्राच्या माध्यमातून पूर्णपणे वाळवलेल्या तसेच स्वच्छ केलेल्या, शासनाने घालून दिलेल्या निकषानुसार (एफएक्यू दर्जाच्या) शेतीमालाची हमी भावाने खरेदी करण्यात येते व खरेदी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येते. या पारदर्शक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळतो. ही बाब गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पणन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.