Take a fresh look at your lifestyle.

‘हा’ बडा नेता काँग्रेस पक्षाचा ‘हात’ सोडणार? 

'या' कारणामुळे पक्षनेतृत्वावर नाराजी

सातारा: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सर्वाधिक आग्रही असणारे आणि आपल्या नेतृत्वाविषयी पटणाऱ्या आणि न पटणाऱ्या गोष्टीही ठामपणे मांडणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तसेच इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी पक्षनेतृत्वाला ज्या २३ नेत्यांनी पत्र लिहिलं होतं, त्या नेत्यांमध्ये पृथ्वीराजबाबाही होते. त्यामुळे बाबांची पक्षनेतृत्वावर नाराजी आहे का? महत्त्वाचं म्हणजे नुकताच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणाऱ्या ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचीही पृथ्वीराजबाबांनी भेट घेतली होती. त्यामुळे बाबांच्या मनात काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याची तयारी सुरु आहे का? असे प्रश्न उपस्थित होत होते. अखेर या प्रश्नांना बाबांनी उत्तर देत पक्ष सोडण्याच्या चर्चांवर पडदा टाकला आहे.
“जर पंतप्रधान मोदींवर आपण हुकूमशाहीचा आरोप करतो तर आपल्या पक्षात लोकशाही असणे हे जास्त गरजेचे आहे. पक्षांतर्गत लोकशाही राहावी, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. त्याच उद्देशातून आम्ही २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात आम्ही अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. आमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी एक मागणी होती की निवडणूक व्हावी… आता या निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. पण या दरम्यानच्या काळात मी पक्ष सोडणार असल्याच्या अफवा पसरल्या. पण मी काँग्रेस विचारांचा माणूस आहे. पक्ष कधीही सोडणार नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
“कार्यकारिणीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तींशिवाय ज्या नेमलेल्या व्यक्ती होत्या त्यापैकी बहुतेक ‘होयबा’ होत्या आणि त्याचे विपरीत परिणाम पक्षांतर्गत लोकशाहीवरती होत होते. पक्षाच्या नेतृत्वाभोवती एक चौकडी तयार झालेली होती आणि त्यामुळे केवळ नेतृत्वाचे गुणगान गात राहणे हाच अनेकांचा पक्षात राहून एक कलमी कार्यक्रम होता. त्यामुळे आम्ही २३ नेत्यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहून निवडणूक घेण्याची मागणी केली होती”, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
“लोकशाही धोक्यात आल्याने ती वाचवण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे. काँग्रेसला बळकट झाली पाहिजे. काँग्रेस पक्ष हाच फक्त भाजपचा मुकाबला करू शकतो. भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला निश्चित फायदा होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. दुसरीकडे गोव्यात ८ आमदारांनी काँग्रेसचा हात सोडल्याच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं. अतिशय दुर्दैवी घटना आहे. याआधीही कश्मीरमध्ये काँग्रेस पक्षात असं घडलं होतं. आता ही लागोपाठ दुसरी घटना आहे. देशात हाच पॅटर्न सुरू आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.