Take a fresh look at your lifestyle.

सुजित पाटलांचा लम्पीबद्दल शेतकऱ्यांना सल्ला

घाबरून जावू नका ; सतर्क रहा

पारनेर : सध्या राज्याबरोबरच तालुक्यातही लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत चालल्याने पशुपालक चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. लम्पी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या पाच किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचा सल्ला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी दिला.
पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये जनावरांना लम्पी स्कीन या रोगाची लागण झाली आहे. या संदर्भात सुजित झावरे पाटील राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन जनावरांमध्ये होत असलेल्या लम्पी आजाराबाबत जनावरांचे लसीकरण करण्याबाबत मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन जनावरांमध्ये वाढत असलेल्या लम्पी आजाराबाबत पारनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण करण्याबाबतही सुचना केल्या होत्या.
आज तालुक्यातील सारोळा अडवाई येथे जनावरांचे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की,
राजस्थान मध्ये लंपी आजाराने ४० हजारांपेक्षा जास्त जनावरे दगावली आहे. महाराष्ट्र सरकारने लम्पी आजारांचे गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली. माणसामध्ये जसा कोरोना सारख्या आजाराची परिस्थिती होती तशीच परिस्थिती जनावरांमध्ये लम्पी आजारामुळे होत आहे. लम्पी आजाराने शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. लम्पी हा त्वचा रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो माणसाला होत होत नाही. तरीही जनावरांना हाताळणाऱ्या शेतकऱ्यांनी हातात रबरी हातमोजे घालावेत, बाधित दुधाची विल्हेवाट लावावी, पाश्चराईजड दुधाचा वापर करावा, गोठा परिसर निर्जंतुक करावा व कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. लंपी आजाराचे लक्षणे अंगावर गाठी, सुरुवातीस ताप, डोळ्यातून, नाकातून चिकट पाणी, चारा, पाणी खाणे कमी अथवा बंद, काही जनावरांमध्ये पायावर सूज येणे व लंगडणे अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरित तालुका पशूवैद्यकीय अधिकारी विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. तसेच पशूधन वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पुढे यावे असे आवाहन झावरे पाटील यांनी केले.
यावेळी उद्योजक संदीप कपाळे, सोपान मुंजाळ, शंकर महांडूळे, सतीश महांडूळे, सुरेश फंड, काशिनाथ फंड, भाऊसाहेब महांडूळे, शोभा फंड, उत्तम फंड, सुनिल शिंदे, अरुण फंड, पोपट फंड, दत्तात्रय फंड, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड तसेच परिसरातील शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थितीत होते.