Take a fresh look at your lifestyle.

टाळ पखवाजाच्या गजरात गणरायाला निरोप !

पारंपारिक पद्धतीने विसर्जन

श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संत निंबराज महाराज गणेश मंडळाच्या वतीने टाळ पखवाजाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.
लक्ष्मीकांत उर्फ बाळकाका दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तर मंडळाच्या वतीने आयोजित उपक्रमाला उदंड प्रतिसाद देताना श्री संत निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला विद्यालयाच्या तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी सामुहिक गणपती अथर्व शिर्ष पठन केले. शेवटी शुक्रवार दि. ९ सप्टेबर रोजी भाऊ पाटील, सुरेश गायकवाड, बाळासाहेब बनकर, जालिंद्र वेताळ, बयाजी बनकर, सुभाष गायकवाड, ज्ञानदेव बनकर, स्वप्निल भवर आदींसह भजनी मंडळाने टाळ पखवाजाच्या गजरात भजन गात गणपती विसर्जन केले.
गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद दैठणकर, संदिप बनकर, गणेश गायकवाड, ओंकार रायकर, नामदेव वाघमारे, सुधीर भवर, दत्ता वाघमारे आदींनी विशेष सहकार्य केले.