Take a fresh look at your lifestyle.

पारनेरकरांनी कामोठ्यातही जपली गावची परंपरा आणि संस्कृती !

बाप्पांना केला मासवडी भाकरीचा नैवद्य

पनवेल : नाना करंजुले
गणपती बाप्पा म्हटलं की मोदक, लाडू आणि गोड अन्न पदार्थांची मेजवानी होय, मात्र कामोठे येथील पुष्प सागर सोसायटीमध्ये गणरायांना चक्क आमटी भाकर व मास वड्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. हाच महाप्रसाद गणेश भक्तांना सुद्धा देण्यात आला. कामोठे स्थित पारनेरकर यांनी आपल्या मूळ गावची खाद्यसंस्कृती त्याचबरोबर परंपरा जपत अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला.
पारनेर तालुक्यातील हजारो कुटुंब मुंबईसह पनवेल परिसरात नोकरी-व्यवसायानिमित्त स्थिरावले आहेत. विशेष करून कामोठे वसाहतीत मोठ्या प्रमाणात पारनेरकर स्थायिक झाले आहेत. कामोठे ला मिनी पारनेर असे संबोधले जाते. याठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांची आपल्या गावाकडील नाळ आजही कायम आहे. तेथील परंपरा, बोलीभाषा, पेहराव त्याचबरोबर खाद्यसंस्कृती मुंबईतील पारनेरकरांनी सोडलेली नाही. ती संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचे काम येथील रहिवासी करीत आहेत. नव्या पिढीला त्याची जाणीव करून दिली जात आहे. पारनेर चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील मासवडी होय संपूर्ण तालुक्यात हा खाद्यपदार्थ अत्यंत फेमस आहे. पाहुणे घरी आल्यानंतर ते जर शाकाहारी असतील तर त्यांना मासवडीचं जेवण करून आदरतिथ्य केले जाते. त्याचबरोबर तालुक्यातील पठार भागावर आमटी भाकर हे जेवण सुद्धा अत्यंत लोकप्रिय आहे. या अन्नपदार्थाचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. ही खमंग जेवणाची मेजवानी आणि पारनेर एक वेगळं नातं गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अगदी हाच धागा पकडून कामोठे वसाहतीतील पुष्प सागर सोसायटीमधील गणेशोत्सवानिमित्त मासवडी आमटी भाकरीचा बेत आखण्यात आला होता. या सोसायटीमध्ये जवळपास सर्वच पारनेरकर आहेत . त्यामुळे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जाते. अत्यंत एकोपा आणि गुण्यागोविंदाने राहणाऱ्या पुष्प सागर सोसायटीतील कामोठेस्थित पारनेरकरांनी इतर गोड-धोड जेवणाबरोबरच पारनेरची खाद्यसंस्कृती आणि परंपरा जपण्याच्या उद्देशाने सोसायटीतील बाप्पांना मासवडी आणि आमटी भाकरी चा नैवेद्य दाखवला.
त्याचबरोबर गणेश भक्तांना सुद्धा महाप्रसाद म्हणून या जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळवून दिले. गुरुवारीअमोलशेठ सैद ,अर्जुन शेठ डांगे, सामाजिक कार्यकर्ते भाऊ शेठ पावडे,बबन गोगावले, संतोष गोळे, पत्रकार नाना करंजुले, गौरव जहागीरदार,प्रदिप शेठ वाफारे,एकनाथ आहेर,दत्तात्रेय औटी,शिवाजी आहेर उपस्थित होते सोसायटीचे अध्यक्ष मंजाराम दातीर,सचिव कुंडलिक  वाफारे, ज्ञानदेव आहेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कांदा लिंबू भाजी अवघी विठाई माझी!
कामोठे येथील पुष्प सागर सोसायटीमध्ये वारकरी संप्रदायाचे अनेक कुटुंब राहतात. त्यामुळे सोसायटीच्या गणरायाला पंढरीची आरास करण्यात आली होती. त्यामध्ये वारकरी दाखवून मंगलमय वातावरण भक्तिमय करण्याचा प्रयत्न सोसायटीकडून करण्यात आला. त्यातच मासवडी आमटी भाकरीच्या महाप्रसादाचा बेत आखण्यात आला. हे जेवण घेताना कांदा लिंबूचा आस्वाद घेता आला. हा अनोखा योग पुष्प सागर सोसायटीमध्ये जुळून आला.