Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुक्यातील ‘या’ सोसायटीत झाला लाखांचा घोटाळा

सहकार खात्याच्या निर्णयाकडे लक्ष

पारनेर : तालुक्यातील गुणोरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये १४ लाख २२ हजार ९२९ रूपयांचा गैरव्यवहार झाला असून संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने सहाय्यक निबंधक गणेश औटी यांचे त्याकडे लक्ष वेधले आहे. संस्थेमध्ये अफरातफर झाल्याची नोटीस लेखापरीक्षक एस.आर. दिवटे यांनी माजी संचालकांना बजावली असून त्यावर मागितलेल्या खुलाशाला संचालकांनी काहीही उत्तर दिलेले नाही. दरम्यान, संस्थेतील या घोटाळयाची गुणोरे व परिसरात जोरदार चर्चा सुरू असून सहाय्यक निबंधक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या निवडणूकीत सत्तांतर होउन नव्या मंडळाच्या हाती सोसायटीची सुत्रे आली आहेत. लेखापरीक्षण झाल्यानंतर लेखापरीक्षक दिवटे यांना संस्थेमध्ये अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले. तशी नोटीस माजी संचालकांना बजाण्यात आल्यानंतर विद्यमान संचालकांनी सहाय्यक निबंधक गणेश औटी यांची भेट घेउन या अफरातफरीची दखल घेऊन कारवाईची मागणी केली.
मावळत्या संचालक मंडळाने त्यांच्या कार्यकाळात अनेकदा अनामत रकमा वापरल्याचा आरोप सहाय्यक निबंधकांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला असून बोगस कर्ज उचलण्यात आल्याचेही नमुद करण्यात आले आहे.
लेखापरीक्षक दिवटे यांनी १४ लाख २२ हजार ९२९ इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा ठपका संचालक मंडळावर ठेवला आहे. मागीजल आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण झालेलेे नसतानाही वार्षिक सभेत मंजुरी न घेता संचालक मंडळाने निवडणूक डोळयासमोर ठेऊन सभासदांना लाभांशाचे वितरण केले आहे. लाभांश वाटपाचा निर्णय कोणत्या नियमाला धरून घेण्यात आला. याचाही अहवाल जुन्या संचालकांडून मागविण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संचालक पांडूरंग सदाशिव बढे, यादव सखाराम गोपाळे, सुनिल यशवंत गोपाळे, भाउसाहेब विठ्ठल मेसे, सिंधूबाई रोहिदास मेसे, संगिता रामदास अरण्ये यांनी सहाय्यक निबंधकांची भेट घेऊन गेल्या पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करून सत्य उजेडात आणण्याची मागणी आक्रमकपणे केली आहे. सहकार खाते त्यावर काय निर्णय घेते याकडे गुणोरे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
गुणोरे सोसायटीमधील अपहाराबाबत सचिवासह संचालक मंडळ दोषी असून हा प्रकार दडपण्यासाठी हे प्रकरण सचिवाच्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न संचालक करू लागले आहेत. अपहाराची रक्कम भरण्यासाठी सचिवाच्या नावे एका पतसंस्थेत कर्जप्रकरण करण्याच्या हालचालीही सुरू आहेत. अशा प्रकारे एका सहकारी संस्थेचा अपहार दपडण्यासाठी दुसऱ्यासहकारी संस्थेची मदत घेतली जात आहे.
राजू गोपाळे
ग्रामस्थ, गुणोरे