Take a fresh look at your lifestyle.

पारनेरातील भावी सरपंचांच्या आशेवर पाणी !

आता प्रतिक्षा पुढील कार्यक्रमाची

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील १८ जिल्हे, ८२ तालुक्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या १ हजार १६६ सदस्यांच्या तसेच ६०८ सरपंचांच्या निवडणूकीची राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी घोषणा केली. पुढील महिन्यात १३ ऑक्टोबर रोजी हे मतदान घेण्यात येणार असून याच निवडणूकीतून सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये नगर जिल्ह्याचा मात्र समावेश नाही.यामुळे भावी सरपंचांच्या आशेवर सध्या तरी पाणीच पडले असून त्यांना आता पुढील कार्यक्रमाची प्रतिक्षा लागली आहे.
राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया व गडचिरोली या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी बुधवारी हे आदेश जारी केले.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे दि. १३ सप्टेंबर रोजी त्या त्या तालुक्याचे तहसिलदार निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करतील. दि. २१सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान सुटीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. दि. २८रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देशन पत्रांची छाननी, दि. ३० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत, दि. ३०रोजी दुपारी तिन वाजल्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देणे तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान मतदान, दि. १४ऑक्टोबर रोजी मतमोजणी व निकालाची घोषणा, दि. १९ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक निकालाची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.
दरम्यान, पारनेर तालुक्यासह जिल्हयातील बहुतांश तालुक्यातील गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांची घोषणा मात्र झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर नगर जिल्ह्यासह पारनेर तालुक्याचा आदेशात समावेश आहे का याची विचारणा विविध गावांमधील राजकिय कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. परंतू या आदेशात नगर जिल्ह्याचा समावेशच नसल्याने निवडणूका असलेल्या गावांमधील इच्छुक भावी सरपंच, सदस्यांच्या आशेवर सध्या तरी पाणीच पडले आहे.