Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुक्यात वाळु तस्करी जोमात !

शासनाला लावला जातोय कोट्यावधी रुपयांचा चुना

पारनेर : तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील काळू नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करून तिची चोरी करताना पारनेर पोलिसांच्या पथकाने एका विना क्रमांकाचा ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह जप्त केला. याप्रकरणी पारनेर पोलिसांनी ट्रॅक्टरसह ३ लाख ५४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ढवळपूरी परिसरातील खारवाडी परिसरात पारनेर पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालीत असताना विना क्रमांकाच्या सोनालीका ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पथकाने हा ट्रॅक्टर ताब्यात घेत चालक संतोष किसन चितळकर (रा. खारवाडी, ढवळपूरी ) याच्याकडे वाळू वाहतूकीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे तो आढळून आला नाही. त्यानंतर ट्रॅक्टरसह चालकास ताब्यात घेण्यात येउन पो. कॉ. सागर दत्तात्रय धुमाळ यांनी आरोपी चितळकर याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. धुमाळ यांच्या फिर्यादीवरून चितळकर याच्याविरोधात चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. गहिनीनाथ यादव हे पुढील तपास करीत आहेत.
पारनेर तालुक्यातील एकाही नदीपात्रातील वाळूचा लिलाव झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून वाळू तस्कर हे लिलाव होऊ देत नाहीत. लिलाव रद्द झाल्यानंतर सर्वच नदीपात्रांमधील वाळूची तस्करी करण्यात येते. त्यातून शासनाला कोटयावधी रूपयांचा चुना लावला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागापासून तहसिल कार्यालय तसेच पोलिसांपर्यंत साखळी करण्यात येऊन ही तस्करी सुरू असते. अलिकडेच खासदार सुजय विखे यांनी पारनेर दौऱ्यावर असताना जो पर्यंत राधाकृष्ण विखे हे महसूल मंत्री आहेत, तोपर्यंत तालुक्यात वाळू तस्करी होऊदेणार नाही अशी घोषणा केली होती. विखे यांची ही घोषणा ताजी असताना वाळूतस्कर मात्र राजरोसपणे वाळू उपसा करीत आहेत.