Take a fresh look at your lifestyle.

स्वतःमध्ये सत्य स्विकारण्याची ताकद नसते !

सत्य गोष्टी असत्यात बदलता येत नाहीत.

आयुष्याचा बराचसा भाग भ्रमात आणि मग भ्रमनिरास पचवण्यात जातो.व्यवहारीक भ्रम हा नित्याचा भाग आहे. उदाःआपण एखाद्याला कायम मदत करीत असलो आणि आपणच अडचणीत आलो तर तो आपल्याला मदत करील हे मनाच्या एका कोपऱ्यात पक्क झालेलं असतं.पण तसं घडलं नाही. त्याने मदत केली नाही तर भ्रमनिरास आणि तो पचवण्यासाठी होणारा त्रास हे व्यवहारीक जगताचं उदाहरण आहे.हे आपण स्वतः तयार केलेले भ्रम आहेत त्यामुळे ते आनंदाने भोगण्यातच शहाणपण आहे. आता ते आनंदाने भोगायचे कसे?भोगता येतात का?हा एक सखोल चिंतनाचा विषय आहे.
त्यावर आपण कधीतरी सविस्तर बोलु.पण इतकच सांगतो की कोणताही भोग आनंदाने भोगुन संपवता येतो.आध्यात्मिक जीवनधारा ते शिकवते.
आपण आज ज्या विषयावर चिंतन करीत आहोत तो विषय सत्याशी निगडित आहे.तो विषय आपण तयार केलेला नाही. आपल्या कर्मामुळे तयार झालेला नाही. ते वैश्विक सत्य आहे,ते म्हणजे आपण एकटे आहोत.कितीही गोतावळा,मित्रपरिवार सोबत असेल तरीही आपण एकटे आहोत हे सत्य स्विकारायला खूप हिम्मत लागते.ती हिम्मत होतच नाही. हा विचारच जगण्याची दिशा बदलवणारा आहे. पण स्विकार होत नाही. ही कल्पना बेचैन करणारी आहे.त्याने सत्य बदलत नाही, बदलता येत नाही.हे’माझं’आहे हे असत्य आयुष्यभर जपतो आम्ही.
स्थावर,जंगम,नातेवाईक,अपत्य संबंधानं केलेलं भाष्य किती कुचकामी आहे हे सत्य तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगताना म्हणतात,
सर्व सुखाचिया आशा जन्म गेला।क्षण मुक्ती यत्न नाही केला।।हिंडता दिशा सीण पावला।माया वेष्टिला जीव माझा।।माझे स्वहित नेणती कोणी।काहीं न करता मजवाचुनी।।स्वजन तवं सुखमांडणी।नेणती कोणी आदीअंत।।
दिसणाऱ्या गोष्टीलाच सत्य समजण्याचं कारण मायेचं आवरण आहे. ‘माया’ म्हणजे ‘भ्रम’.डोळ्यांना जे दिसतं त्यालाच सत्य मानण्याचा स्वभाव.मनुष्याचा हा स्वभावधर्म आहे.त्यामुळे पुढे भ्रमनिरास ठरलेला आहे.
अझुनि तरी होई जागा।तुका म्हणे पुढे दगा।। असं तुकोबाराय म्हणतात. हा दगा होऊ नये म्हणून सत्य स्विकारण्याची तयारी आपण केली पाहिजे.आपण मायेत गुरफटून रहाण्यालाच सुख समजलो त्यामुळे बंधमुक्त होण्यासाठी कधी प्रयत्न झालेच नाहीत असच खरं चित्र आहे.आपल्या मानण्या न मानण्यानं सत्य बदलत नाही.सत्याला असत्यात परावर्तित करता येत नाही. त्याचा स्विकार करण्यातच हित आहे.माया समजण्यासाठी ‘ब्रम्ह’जाणणं आवश्यक आहे. प्रकाशाचं ज्ञान तेव्हाच होतं जेव्हा अंधार अनुभवला असेल.आम्ही मायारुपी अंधार नित्य अनुभवत आहोत मात्र सत्यरुपी प्रकाशाकडे जाण्याची इच्छा होत नाही हे अजून एक सत्य आहे.ते सत्य स्विकारण्याची हिम्मत ज्ञानप्राप्तीनेच शक्य आहे.
रामकृष्णहरी