Take a fresh look at your lifestyle.

कोण लंकें ? मी ओळखत नाही !

'या' नेत्याने डागली तोफ

ढवळपुरी : गेल्या ३१ मे रोजी शरद पवार आणि आ. रोहीत पवार यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या चोेंडी येथे घाणेरडे राजकारण केले. त्या मातेच्या दरबारी अती चालत नाही. त्यामुळेच त्यांचे सरकार दोन महिन्यांतच पडले. जनरोषामुळे चोंंडीचा कार्यक्रम गुंडाळण्याची नामुष्की आ.रोहीत पवार यांच्यावर आली. तिथे राजकारण करणारांची माती होते. तीच गत आता पवारांची होणार आहे. पवार-ठाकरे सरकारने फडणवीस सरकारच्या काळात आहिल्यादेवी सभागृहाची मंजुरी मिळालेल्या ७० पैकी १८ सभागृहांची कामे बंद पाडली. त्यांची नियतच वाईट आहे अशी जहरी टिका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
ढवळपूरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पडळकर बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळवून देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून आपण खास प्रयत्न करणार असून त्यासाठी पाठपुरावाही करणार आहोत. सन २०१९ मध्ये धनगर बांधवांच्या हजारो मेंढया मृत्यूमुखी पडल्या. परंतू तत्कालीन सरकारने धनगर बांधवांना भरपाई न देता त्यांची चेष्टा केली. आता शिंदे-फडणवीस सरकारकडून बांधवांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देऊ. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबात महाविकास आघाडीच्या सरकारने समाजाच्या तोंडाला पाने पुसली. आता मात्र न थांबता आरक्षण मिळविणारच आहोत. महाविकास आघाडीच्या सरकारला धनगर समाजाच्या विविध योजनांचा विसर पडला होता. आता मात्र शिंदे-फडणवीस सरकार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, विकासात्मक कामांत कटीबद असणार आहे. धनगर समाजाच्या पशुधनाचे निसर्गाच्या अवकृपने नुकसान होते, त्याची भरपाई मिळत नाही. अशा सर्व पशुधनाचे सर्वेक्षण करण्यात येऊन सरकार पशुधनाचा विमा भरणार आहे. धनगर समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार वसतीगृहांची स्थापना करणार असून धनगर समाजाच्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश देण्यात येउन शिक्षणाचा खर्चही सरकारमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने १ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. धनगर समाजाला या सरकारच्या माध्यमातून २२ योजना मिळणार आहेत. त्यासाठी समाजाने संघटीत राहणे गरजेचे आहे. धनगर समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये योग्य ते प्राधान्य मिळायला हवे असेही पडळकर यांनी सांगितले.
यावेळी भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य विश्‍वनाथ कोरडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, सरपंच डॉ. राजेश भनगडे, सुभाष दुधाडे, मनोहर पारखे, संभाजी आमले, डी. आर. शेंडगे, मोहनराव रोकडे, बापूराव खताळ, पोपट लोंढे, म्हस्कु टकले, अप्पासाहेब थोरात, कुशाहरी भांड, दिपक भागवत, संतोष खोडदे, संतोष कुटे, राजू रोडे, शारदा पांढरे, उषा शेंडगे, मंदा विचारे, विश्‍वास रोहोकले, सुर्यकांत पवार, लक्ष्मण कोकरे, परेश थोरात, सिध्दु कऱ्हे, बाबासाहेब नऱ्हे यांच्यासह धनगर बांधव यावेळी उपस्थित होते.
पवारांच्या खुशमस्करीसाठी !
पारनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी कोण लंके नावाचा माणूस आहे. मी त्यांना पाहिलेले नाही व ओळखतच नाही. पवार घराण्याचा आशिर्वादा मिळण्यासाठी फक्त त्यांच्या खुशमस्कऱ्या सुरू आहेत. वानरसेनेने लंका जाळली. लंकेंची लंका दहन करण्यास वेळ लागणार नाही. धनगर समाजाची मते घेता पण त्यांचे प्रश्‍न सोडवत नाहीत कसले हे लोकप्रतिनिधी ? अशी टिका पडळकर यांनी आमदार नीलेश लंके यांच्यावर केली.
मेळाव्याचा फ्लॉप शो
आपल्या आक्रमक भाषणासाठी प्रसिध्द असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा शुक्रवारी आयोजित करण्यात आलेला मेळावा फ्लॉप झाला. पडळकर यांना ऐकण्यासाठी तालुका नव्हे तर जिल्हयातून गर्दी होईल असे मानले जात होते. प्रत्यक्षात मात्र मेळाव्यास थंडा प्रतिसाद मिळाला. वाडया वस्त्यांवर जाऊन मेळाव्याची जनजागृती करण्यात आली होती. भटकंतीवर असणारा धनगर समाजही सध्या ढवळपूरीतच आहे. शिवाय बाजारचा दिवसही होता. तरीही मेळाव्यास अल्प प्रतिसाद मिळाला. मेळाव्याच्या ठिकाणी त्याची चर्चा चवीने करण्यात येत होती.