Take a fresh look at your lifestyle.

आला रे आला, गणपती आला! 

लाडक्या बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत!

पारनेर : ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि मोरया… मोरयाच्या गजरात आज (बुधवारी) सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले असून तालुक्यात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह होता. सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचं आगमन झाले. त्यामुळे संपुर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
भाविकांना प्रतीक्षा असलेला लाडक्या गणरायाचे आज घरोघरी वाजत गाजत आगमन झाले असून या चैतन्यपर्वामुळे भाविकांमध्ये उत्साहात शिगेला पोहोचला आहे.
मागील दोन वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचे आगमन झाले, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचे मळभ दूर झाल्याने भाविकांनी जोरदार उत्साहात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान आठवडाभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती तर कालपासूनच तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या. दरम्यान आज सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तीची खरेदी करत गणेशाचे घरोघरी आगमन तसेच मंडळांचे आगमन होत आहे.
दरम्यान घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले असून दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात आली. पूजा साहित्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमुळे बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. तर आजही खरेदीसाठी पारनेर शहरासह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. घरोघरीच्या बाप्पांच्या स्वागताबरोबरच शहरातील ऑफिसेस, दुकाने आदी ठिकाणीही गणपतीची स्थापना करुन प्रत्येकजण आपापल्या परीने बाप्पांचे जोरदार स्वागत करीत आहे.
तसेच दोन वर्ष पारनेर शहरासह तालुक्यातील मोठया गावात सार्वजनिक मंडळांचे गणपती स्थापना झालेली नव्हती. मात्र यंदा धुमधडाक्यात बाप्पांचे आगमन झाले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून गणेश मंडळांचीही सकाळपासूनच धावपळ सुरू होती. ढोलताशे, बँडपथक, ध्वजपथक, सनई-चौघड्याच्या निनादात रथामध्ये किंवा पालखीमध्ये बसवून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेण्यात येत आहेत.
शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाअर्चा करून गणरायाची घरोघरी स्थापना करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिलामंडळ व्यग्र झाले असून काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली.