Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या ‘या’ प्रलंबित प्रश्नांसाठी कोरडे दादांचा ध्यास !

सर्वसामान्यांचा विकास हाच वाढदिवसाचा संकल्प

पारनेर : तालुक्यातील सर्वसामान्य जनतेशी आपली बांधिलकी असून याच भावनेतून पुणे शहरातील व्यवसाय सोडून आपण पारनेरला आलो असल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतीचे पाणी, शिक्षण आणि रोजगार हाच आपला ध्यास असल्याचे भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त हाच आपला संकल्प असून शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.
वाढदिवसाच्या पार्श्‍वभुमीवर ‘पारनेर दर्शन’शी बोलताना कोरडे म्हणाले की, आपणास कोणतीही राजकिय पार्श्‍वभूमी नाही. वडीलांनी मुंबईत हमाली केली. माझे बालपणही मुंबईतच गेले. त्यानंतर मी पुण्यात आलो. प्लास्टीक मोल्डींगचा व्यवसाय सुरू केला. परंतू तो देखील अयशस्वी ठरला. त्यानंतर किराणा व्यवसायात स्थिरावलो. दुधाच्या व्यवसायातही प्रचंड यश मिळाले. व्यवसाय करीत असताना सामाजिक क्षेत्रात पदार्पण केले. १९९०च्या आसपास पुण्यातील भोसरी येथे लोकमान्य मित्र मंडळ त्यानंतर नगर जिल्हा मित्र मंडळ, धर्मवीर संभाजी सहकारी बँक, अष्टविनायक शिक्षण संस्था यांची स्थापना केली. नगर जिल्ह्यातील पुणे स्थित विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने सन २००९ साली भोसरी येथे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक संस्थेची उभारणी केली. सन २००८ साली रूपी बँकेचे संचालक म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यानंतर याच दरम्यान पारनेर तालुक्यात विविध कामानिमित्त येणे जाणे वाढले. यावेळी तालुक्यातील बेरोजगारी व पाणी प्रश्‍न गांभीर्याने जाणवल्यानंतर पारनेरला येण्याचे ठरविले.
बेरोजगारांना रोजगार देण्याचा छोटासा प्रयत्न करण्याच्या हेतूने जवळे येथे अंजना डेअरीची स्थापना केली. पाणी व बेरोजगारीच्या प्रश्‍नासाठी विधानसभा लढविण्याचाही प्रयत्न केला. परंतू पक्षश्रेष्ठींनी न्याय दिला नाही. विधानसभेपूर्वी जिल्हा परिषदेलाही उमेदवारीची मागणी केली होती. परंतू या निवडणूकीतही पक्षश्रेष्ठींनी डावलल्याने संघर्ष करून अपक्ष उमेदवारी करून झेड.पीत विजयी झालो. या वाटचालीत मुख्यतः शिक्षण हाच आपला मुद्दा होता. आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्याने त्यावेळीही ७७ संगणकाचे, प्रोजेक्टरचे वेगवेगळया शाळांना आपण वितरण केले. हे करीत असताना मते मिळविणे हा हेतू न ठेवता समाजाच्या फायद्याचा विचार आपण केला.

पारनेरच्या पाणीप्रश्‍नासाठी कुकडी, पिंपळगांव जोगा या हक्काच्या पाणीप्रश्‍नासाठी अनेक आंदोलने, बैठका, मोर्चा, रस्ता रोको या माध्यमातून गेली १४ वर्षे सतत संघर्ष केला. हंगा नदीवरील पाणी आडविण्यासाठी अण्णा हजारे यांच्या मदतीने हंगा नदीवर बंधारे बांधून वाया जाणारे पाणी आडविण्याचे काम केेले. हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश असल्याचे सांगत ५५ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास १ टी.एम.सी.पाणी आडविण्याचे काम करून आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती ओलीताखाली आणल्याने वाडेगव्हाण व परिसरातील जनता खुश आहे. आगामी काळात पठार भागाच्या उपसा जलसिंचन योजनेसाठी प्रयत्न करीत आहे. अण्णा हजारे यांच्या माध्यमातून तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत बैठकही झाली होती. या बैठकीत पिंपळगांव जोगा धरणाच्या पुढील पारनेर तालुक्यातील ११ गावांना प्रवाही पध्दतीने पाणी, डिंबे, माणिकडोह डोंंगर बोगदा खोदून वाया जाणारे ४.५ टी.एम. सी पाणी, पिंपळगांव खांड (अकोले) धरण पाण्याने नदीपात्रात पारनेर तालुक्यातील बंधारे भरण्यात येत नाहीत. ही मर्यादा ओलांडून या नदीपात्रातील पाणी पारनेर तालुक्यातील बंधाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी अण्णा हजारे यांच्या वतीने गिरीश महाजन यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनीही त्या सरकारच्या काळात ही मागणी मान्य केली होती.
जिल्हा विद्युत मंडळाचा सदस्य असताना वीजेची समस्या सोडविणे, पुर्ण दाबाने वीज द्यावी, सिंचनासाठी दिवसा वीज असावी या मागणीचा आपण पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेअंतर्गत १४ गावांचे प्रस्ताव दाखल असून या संदर्भात कागदपत्रे, मोजणी, वनविभाग ना हरकत दाखला यासाठी आपण शासकिय यंत्रणेविरहीत स्वतः प्रयत्न केले असून या योजनेला लवकरच यश मिळेल असा विश्‍वास व्यक्त करीत श्री.कोरडे म्हणाले की, दिवसभर भरपूर वीज असावी असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन आहे. त्यानुसारच माहावितरण व सौरउर्जेच्या अधिकाऱ्यांनी काही जागांची पाहणी केली असून त्याला पसंतीही दिली आहे. त्यामुळे तालुक्यात लवकरच सौर उर्जेची निर्मिती होउन वीजेचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.
आगामी राजकारणाविषयी बोलताना कोरडे म्हणाले की, गेली ३५ वर्षे आपण आपले आयुष्य सामाजिक जीवनासाठी वेचले आहे. निवडणूक हे आपले ध्येय नसून पक्षश्रेष्ठी सांगतील त्या पध्दतीने आगामी काळात विचार करणार आहे. कुणीतरी मदत केल्यामुळेच माझे शिक्षण पुर्ण झाले आहे. हेच उद्दीष्ट डोळयासमोर ठेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी यासाठी ६०० पुस्तके खरेदी केले असून त्याची वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी केक कापला जातो. परंतू यातील ७५ टक्के केक वाया जातो. यावर वाढदिवसानिमित्त आपण वेगळा पर्याय शोधला असून गुळाच ढेप कापून वाढदिवस साजरा करणार आहोत. ही प्रथा देशभर साजरी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करीत देशात गुळाची मागणी वाढून पर्यायाने शेतकऱ्यांना बाजारभाव वाढेल असे सांगत पुर्वी भारतीय संस्कृतीनुसार गुळाची शेरणी वाटली जात होती. तिच पध्दत वाढदिवसाला दृढ होऊन महाराष्ट्राची संस्कृती व शेतकरी हित जोपासण्याचे काम या माध्यमातून होणार असल्याचेही कोरडे यांनी सांगितले.
पाणी हेच आयुष्याचे स्वप्न !
आपण शेतीच्या पाण्यासाठी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेकांनी आपल्याला वेड्यात काढले मात्र,मी ध्येयवेळा असल्याने हा संघर्ष सुरूच ठेवला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यासाठीचा हा लढा कायम ठेवणार असून कान्हूर पठार सारख्या पठारी भागास दोन टी.एम.सीचे पाणी मिळाल्यानंतर या भागातील जनता खुश होणार असून तेच आपल्या आयुष्याचे स्वप्न असल्याचे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.