Take a fresh look at your lifestyle.

अजबच : पारनेरातील ‘या’ नेत्याच्या वाढदिवसाला कापणार गुळाची ढेप !

भजनाची मैफिल अन् मासवड्यांची मेजवानी

जवळा : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांचा वाढदिवस केक नव्हे तर सेंद्रीय गुळाची ढेप कापून साजरा करण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा वाढदिवस साजरा करण्याचा यामागील हेतू आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.२८ ऑगस्ट रोजी कोरडे यांचा ५४ वा वाढदिवस असून त्या निमित्ताने राळेगणथेरपाळ येथील सिध्दी लॉन्स मध्ये सायंकाळी ६ ते ९ दरम्यान विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभरात कोठेही केक कापण्यात येणार नसून सेंद्रीय गुळाची ढेप कापून, शेरणी वाटून तसेच औक्षण करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे इतरांनी अनुकरण केले तर शेतकरी तयार करीत असलेल्या गुळाला बाजारपेठ मिळू शकेल असा विश्‍वास संयोजकांनी व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त ज्ञानेश्‍वर मेश्राम, पार्श्‍वगायिका ज्योती गोराने आणि कल्याणी देशपांडे यांच्या भजनांजली या कार्यक्रमाचे सिध्दी लॉन्स येथे आयोजन करण्यात आलेे आहे. त्याबरोबरच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, इन्फोसिसच्या सुधा मुर्ती, पोलिस अधिकारी विश्‍वास नांगरे पाटील आदी लेखकांच्या सहाशे पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी इतर भेट वस्तूंऐवजी विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे शालेय साहित्य भेट स्वरूपात देण्यात आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी मासवडीच्या जेवणाचा बेत ठेवण्यात आला आहे.