Take a fresh look at your lifestyle.

कान्हूर पठारला आज रंगणार निकाली कुस्त्यांचा आखाडा

लाखोंच्या बक्षिसांची होणार खैरात

कान्हूरपठार : बैलपोळा व गौराई यात्रोत्सवानिमित्त कान्हूरपठार येथे शनिवारी निकाली कुस्त्यांचा थरार रंगणार आहे. या हगाम्यात विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वतीने १ लाख ११ हजार १११ रूपयांचे इनाम व चांदीची गदा इनाम देण्यात येणार आहे.
कान्हूरपठारचा बैलपोळा व गौराई यात्रोत्सव प्रसिध्द आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे शनिवारी कुस्त्यांच्या आखाडयाचे आयोजन करण्यात आले आहे. या लढतींमध्ये कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी व महान भारत केसरी पै. माऊली जमदाडे, दिल्ली येथील सतपाल आखाडयाचा इंटरनॅशनल भारत केसरी पै. बंटीकुमार, पारनेरच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा महाराष्ट्र केसरी पै. योगेश पवार, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. समीर देसाई, सोनई केसरी, उत्तर महाराष्ट्र केसरी पै. अनिल ब्राम्हणे, पुणे येथील मामासाहेब कुस्ती संकुलाचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. दिपक मोहिते, पारनेरच्या शिवछत्रपती कुस्ती संकुलाचा महाराष्ट्र चॅम्पियन, शेवगांव केसरी पै. ॠषी लांडे, मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलाचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. शेखर दोडगे, हरियाणा इंटरनॅशनल चॅम्पियन पै. साहिल पोंगाल, अकोले येथील वस्ताद तान्हाजी नरके यांचा पठ्ठा पै. संकेत जाधव यांच्या प्रमुख लढती होणार आहेत. उर्वरीत लढती योग्य जोड लावून लावण्यात येतील. विजेत्या पैलवानांना स्व. व्हि.बी. ठुबेे सर यांच्या स्मरणार्थ पत्रकार श्रीकांत ठुबे यांच्या वतीने मानाची ढाल देण्यात येईल. तर विजेतेपद पटकाविणाऱ्या मल्लास विजयानंद साळवे यांच्या वतीने चांदीची ढाल प्रदान करण्यात येणार आहे.
पोळयानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीतील गावातील उत्कृष्ट बैलजोडी मालकास ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या वतीने चांदीचे कडे भेट म्हणून देण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दिड वाजता किन्ही रोड, कान्हूरपठार येथे पार पडणाऱ्या मैदानासाठी जास्तीत जास्त कुस्ती शौकिनांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.