Take a fresh look at your lifestyle.

बैलपोळ्यातही… ५० खोके,एकदम ओके !

विधीमंडळातील खोचक नारा बैलांच्या अंगावर

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ५० खोके, एकदम ओके ही विरोधकांची नारेबाजी जोरदार चर्चेत राहिली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे देखील पाहायला मिळा. एकीकडे विरोधकांकडून ५० खोके, एकदम ओके अशा घोषणा देऊन सत्ताधारी शिंदे गटाला टोला लगावला असताना सत्ताधाऱ्यांनी देखील लवासाचे खोके, बारामती ओकेसारख्या घोषणा देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले दरम्यान, या घोषणाबाजीनंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अंगावर आलात तर शिंगावर घेऊ म्हणत विरोधकांना जाहीर आव्हानच दिले होते. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी खोचक टोला लगावला आहे.
▪️काय म्हणाले होते भरत गोगावले?
भरत गोगावले यांनी विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना आव्हान दिले होते. “आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही. मात्र, अंगारवर आलात तर शिंगावर घेऊ. आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हाला डिवचले तर आम्ही कुणाला सोडणार नाही”, असे गोगावले माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.
▪️मिटकरींनी ट्वीट केला ‘तो’ फोटो!
दरम्यान, या मुद्द्यावरून आता अमोल मिटकरींनी गोगावलेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. अमोल मिटकरींनी एक फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये एका बैलावर ‘५० खोके, एकदम ओके’ असे लिहिले आहे. आज बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांना सजावट करताना हा खोचक संदेश बैलावर लिहिण्यात आला आहे. या फोटोसोबत मिटकरींनी “आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी तर म्हणतो घेऊनच बघा”, असं खोचक ट्वीट केले आहे.
दरम्यान, आपल्या ट्वीटबाबत बोलताना मिटकरी म्हणाले, “तलावावरून शेतकऱ्यांनी जेव्हा आपली गुरं-ढोरं धुवून आणली, तेव्हा बैलांवर ५० खोके, एकदम ओके हा नारा त्यांनी लिहिला. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळ अधिवेशनात गाजलेला नारा आज बैलांवरही दिसतोय. या माध्यमातून बळीराजानेच ५० खोके घेणाऱ्यांना आव्हान दिलंय की जर ५० खोके एकदम ओके बोलल्यानंतर तुम्ही शिंगावर घेत असाल, तर आम्ही आमच्या बैलजोडीवरच ते लिहिले आहे. हिंमत असेल तर यांना शिंगावर घेऊन दाखवा”, असे आव्हान मिटकरींनी दिले आहे.