Take a fresh look at your lifestyle.

संदीप वराळ हत्या प्रकरणातील आरोपींचे जामीन फेटाळले

नगर न्यायालयाने दिला 'हा ' निर्णय

नगर : निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्याकांडाचा सुत्रधार प्रवीण रसाळ तसेच हत्याकांडातील आरोपी ॠषीकेश उर्फ भैय्या भोसले यांनी नगरच्या न्यायालयापुढे मांडलेला मोक्कांतर्गत कारवाईतील जामीन अर्ज फेटाळण्यात आला. यापूर्वी रसाळ व भोसले यांनी नाशिकच्या न्यायालयापुढेही जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी नगरच्या न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज केला होता. तो अतिरिक्त सत्र न्यायाधिश मिलिंद कुर्तडीकर यांनी फेटाळला.
निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांची दि.२१ जानेवारी २०१७ रोजी प्रवीण रसाळ या कुख्यात गुंडाच्या टोळीने निघोजच्या बाजारपेठेत भर दिवसा निर्घुण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्याकांडाचा सुत्रधार प्रवीण रसाळ, माऊली रसाळ, विकास रसाळ, पिंटया रसाळ, ॠषीकेश उर्फ भैय्या भोसले, नागेश लोखंडे, राहूल साबळे, अक्षय लुढे, प्रशांत बर्डे, प्रशांत वराळ, राजू भंडारी व मुक्तार इनामदार यांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यापूर्वी या आरोपींपैकी माऊली रसाळ, पिंटया रसाळ, राजू भंडारी तसेच मुक्तार इनामदार यांना न्यायालयाने जामीन मंजुर केलेला आहे.
चौघांना जामीन मिळाल्यानंतर मुख्य सुत्रधार प्रवीण रसाळ व ॠषीकेश उर्फ भैय्या भोसले यांनी नगरच्या न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. या अर्जावर युक्तीवाद होऊन प्रवीण रसाळ हा हत्याकांडाचा सुत्रधार असल्याने तसेच भैय्या भोसले याचा प्रत्यक्ष हत्याकांडात सहभाग असल्याचे कारण देत त्यांचे जामीन फेटाळण्यात आले.सरकारी वकील अ‍ॅड. ढगे, फिर्यादी पक्षाच्या वतीने अ‍ॅड सचिन बाबर, रघुनाथ मुरूमकर हे उपस्थित होते.